भारत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण असलेल्या पहिल्या दहा देशांमध्ये

नवी दिल्ली – कोरोनाचे सार्वधिक रुग्ण असलेल्या पहिल्या १० देशांच्या यादीत भारत दाखल झाला आहे. रविवारपासून सोमवारच्या सकाळपर्यंत देशात ६९७७ नवे रुग्ण आढळले. चोवीस तासात नवे रुग्ण सापडण्याचा हा नवा उच्चांक ठरला आहे. यामुळे देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या १,३८,८४५ पर्यंत पोहोचली, तर सोमवारी रात्रीपर्यंत देशातील या साथीच्या रुग्णांची संख्या एक लाख ४५ हजारांपर्यंत पोहोचल्याचे समोर येत आहे. महाराष्ट्रात सोमवारी दिवसभरात या साथीने आणखी ६० जणांचा बळी घेतला. तसेच २,४३६ नवे रुग्ण आढळले. याआधी रविवारी महाराष्ट्रात कोरोनाने ५८ जण दगावले होते आणि तब्बल ३,०४१ नवे रुग्ण आढळले होते.

जगात अमेरिका, ब्राझील, रशिया, ब्रिटन, स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनी आणि तुर्कीनंतर भारतात सर्वधिक कोरोनाचे रुग्ण आढळल्याची नोंद झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून देशात दरदिवशी सहा हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. नवे रुग्ण सापडण्याची हीच गती कायम राहिली, तर येत्या चार दिवसात रुग्ण संख्येच्या बाबतीत भारत तुर्कीलाही मागे टाकेल, अशी भीती व्यक्त केली जाते. २५ मार्चला लॉकडाऊन सुरु होण्यापूर्वी पहिल्या ५० देशातही नसलेल्या भारतात वाढलेली कोरोनाच्या रुग्णांची संख्या चिंताजनक बाब ठरते.

भारतात या साथीने दगावलेल्या रुग्णांची संख्या चार हजाराच्या पुढे गेली आहे. महाराष्ट्रातच १,६९५ रुग्णांचा या साथीने मृत्यू झाला आहे. तसेच एकूण रुग्णांची संख्या ५२ हजारांच्या पुढे पोहोचली आहे. सोमवारी राज्यात ६० जण कोरोनाने दगावले, यातील ३८ जण मुंबईतील आणि ११ जण पुण्यातील होते. मुंबईत चोवीस तासात १४३० नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच मुंबईतील या साथीने दागवलेल्यांची संख्या हजाराच्या पुढे गेली आहे.

तामिळनाडूत दिवसभरात ८०५ नव्या रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रानंतर तामिळनाडू हे कोरोनाच्या रुग्णांच्या बाबतीत आघाडीवर असलेले राज्य आहे. या राज्यातील आतापर्यंत १७ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्लीत ६७० नवे रुग्ण आढळले. त्यामुळे या राज्यातील रुग्ण संख्या १४ हजारांच्या पार पोहोचली. गुजरातमध्ये चोवीस तासात ३० जण दगावले असून ४०५ नवे रुग्ण आढळले आहेत. गुजरातमध्ये रुग्णांची संख्या १४,४०० पर्यंत पोहोचली आहे, तर महाराष्ट्रानंतर कोरोनामुळे सार्वधिक बळी याच राज्यात गेले आहेत.

leave a reply