भारत व सौदीची अफगाणिस्तानबाबतची चिंता एकसमान

- सौदीचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैजल

नवी दिल्ली – भारत व सौदी अरेबियाच्या अफगाणिस्तानबाबतच्या चिंता एकसमान असल्याचे सौदीचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स ‘फैजल बिन फरहान अल सौद’ यांनी म्हटले आहे. भारताच्या तीन दिवसांच्या दौर्‍यावर असलेल्या प्रिन्स फैजल यांची ही भेट अफगाणिस्तानातील घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर अत्यंत महत्त्वाची मानली जाते. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याबरोबरील सौदीच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या चर्चेत अफगाणिस्तानचा मुद्दा अग्रक्रमावर होता. याबरोबरच प्रिन्स फैजल यांनी ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाची व भारतीय उद्योगक्षेत्राची प्रशंसा केली आहे.

भारत व सौदीची अफगाणिस्तानबाबतची चिंता एकसमान - सौदीचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैजलसौदीचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैजल यांच्याबरोबर अफगाणिस्तान, आखाती क्षेत्र आणि इंडो-पॅसिफिकबाबत अत्यंत उपयुक्त चर्चा पार पडली. राजकीय, सुरक्षा व सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारी व्यापक करण्यावर दोन्ही देशांचे एकमत झालेले आहे, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी जाहीर केले. तर परराष्ट्र मंत्रालयाने भारत व सौदीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी द्विपक्षीय तसेच क्षेत्रिय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील दोन्ही देशांच्या समान हितसंबंधांवर चर्चा पार पडल्याचे म्हटले आहे.

२०१९ सालच्या ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा दौरा केला होता. यावेळी दोन्ही देशांमध्ये ‘स्टॅ्रटेजिक पार्टनरशिप काऊन्सिल ऍग्रीमेंट’वर स्वाक्षर्‍या झाल्या होत्या. याच्या अंतर्गत दोन्ही देशांमधील व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, संरक्षण, सुरक्षा व आरोग्यक्षेत्र तसेच मनुष्यबळ विकास या क्षेत्रातील सहकार्य व्यापक करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला होता. सदर कराराच्या प्रगतीचा आढावाही परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर व परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैजल यांच्या या चर्चेत घेण्यात आला.

याबरोबरच गल्फ कोऑपरेशन काऊन्सिल, जी२० तसेच संयुक्त राष्ट्रसंघासारख्या बहुपक्षीय व्यासपीठावरील भारत व सौदीच्या सहकार्यावरही यावेळी चर्चा पार पडली. दरम्यान, विशेष माहिती उघड करण्यात आलेली नसली, तरी अफगाणिस्तानबाबत भारत व सौदी अरेबियाच्या भूमिकेला या चर्चेत सर्वाधिक महत्त्व देण्यात आल्याचे संकेत मिळत आहेत.

अफगाणिस्तानबाबतचे भारत व सौदी अरेबियाचे हितसंबंध एकसमान असल्याची बाब या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आली आहे. अफगाणिस्तानबाबत भारत व सौदीला वाटत असलेली चिंता एकसमान असल्याचे प्रिन्स फैजल म्हणाले. अल कायदा, आयएस व तालिबान यांचा अफगाणिस्तानातील उदय ही घातक बाब ठरते, असे दोन्ही देशांना वाटत असल्याचे या चर्चेत स्पष्ट झाले. परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनातही ही बाब नमूद करण्यात आलेली आहे. दरम्यान, सौदी अरेबिया भारताच्या अफगाणिस्तानविषयक भूमिकेवर सहमती व्यक्त करीत असताना सौदी अरेबियाचा प्रतिस्पर्धी मानला जाणारा इराण देखील अफगाणिस्तानबाबतच्या भारताच्या भूमिकेची प्रशंसा करीत आहे. तालिबानने पाकिस्तानसारख्या देशाच्या आहारी जाण्यापेक्षा, भारताशी संबंध प्रस्थापित करावे आणि भारताबरोबरच इराण, रशिया व चीनशी जुळवून घ्यावे, असा सल्ला इराणमधल्या एका प्रभावशाली वर्तमानपत्राने तालिबानला दिला आहे.

leave a reply