अफगाणिस्तान आणि पाकिस्तानकडे भारत व अमेरिका सावधपणे पाहत आहेत

- परराष्ट्रसचिव हर्ष वर्धन श्रिंगला

हर्ष वर्धन श्रिंगलावॉशिंग्टन – ‘भारत आणि अमेरिका अफगाणिस्तानातील घडामोडींकडे अत्यंत सावधपणे पाहत आहेत. विशेषतः पाकिस्तानच्या हालचालींकडे आमची करडी नजर रोखलेली आहे’, असे अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या भारताच्या परराष्ट्रसचिवांनी स्पष्ट केले. तसेच आपण जबाबदार बनलो आहोत, असे संकेत देण्याचा प्रयत्न तालिबान करीत आहे, ही सकारात्मक बाब ठरते, असे परराष्ट्रसचिव हर्ष वर्धन श्रिंगला म्हणाले.

या तीन दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांची भेट घेतली. तसेच अमेरिकेच्या परराष्ट्रसचिव वेंडी शर्मन आणि अमेरिकन उद्योगक्षेत्रातील मान्यवरांचीही श्रिंगला यांनी भेट घेतल्याचे वृत्त आहे. याचे सारे तपशील अद्याप स्पष्टझालेले नाहीत. पण अफगाणिस्तानात तालिबानच्या सरकारस्थापनेचे प्रयत्न सुरू असताना, परराष्ट्रसचिवांचा हा अमेरिका दौरा लक्षवेधी ठरतो. अफगाणिस्तानबाबत बोलताना श्रिंगला यांनी भारताने सध्या ‘वेट अँड वॉच’ अर्थात सावधपणे प्रतिक्षा करण्याचे धोरण स्वीकारल्याचे स्पष्ट केले. अमेरिका देखील अफगाणिस्तानातील घडामोडींकडे अशारितीने पाहत असल्याचा दावा श्रिंगला यांनी केला.

मात्र सावधपणे पाहत राहणे याचा अर्थ काहीच न करणे असा होत नाही, असे सूचक विधान भारताच्या परराष्ट्रसचिवांनी केले. सध्या तालिबानने भारताला आपण जबाबदार बनलो आहोत, असे संकेत देण्याचा प्रयत्न केला. पण आत्तापर्यंत तालिबानबरोबर भारताने केलेल्या चर्चेतून हा सकारात्मक संदेश मिळालेला आहे. पण भारत अजूनही अफगाणिस्तानकडे सावधानतेने पाहत आहे. त्याचवेळी पाकिस्तानच्या हालचालींवर मात्र भारताची करडी नजर रोखलेली आहे, याची जाणीव परराष्ट्रसचिवांनी करून दिली.

पाकिस्तानच्या ‘आयएसआय’चे प्रमुख अफगाणिस्तानात दाखल झालेले असताना, भारताच्या परराष्ट्रसचिवांनी केलेले हे विधान लक्षवेधी ठरते. दरम्यान, 22 ते 27 सप्टेंबर रोजी भारताचे पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यवर जाणार असल्याचे वृत्त आहे. या भेटीत अफगाणिस्तानचा मुद्दा ऐरणीवर असेल, असे सांगितले जाते.

leave a reply