भारतातील कोरोनाच्या बळींची संख्या तीन लाखांवर – अमेरिका व ब्राझिलनंतर सर्वाधिक बळी

नवी दिल्ली – भारतात आतापर्यंत कोरोनाने बळी गेलेल्यांची संख्या तीन लाखांवर पोहोचली आहे. कोरोनामुळे तीन लाखांहून अधिक बळी गेलेला भारत तीसरा देश ठरला आहे. कोरोनामुळे सर्वाधिक बळी हे अमेरिकेत गेले असून अमेरिकेतील बळींची संख्या भारतापेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. तर ब्राझिलमध्येही सुमारे साडे चार लाख जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

बळींची संख्या तीन लाखांवरशनिवारपासून रविवारच्या सकाळपर्यंतच्या चोवीस तासात देशात 3 हजार 741 जणांचा बळी गेला. यामुळे देशात कोरोनाने दगावलेल्यांची संख्या 2 लाख 99 हजार 266 पर्यंत पोहोचली होती. मात्र रविवारी सायंकाळपर्यंत विविध राज्यांनी जाहीर केलेल्या माहितीवरून देशात कोरोनामुळे गेलेल्या बळींची संख्या तीन लाखांच्या पुढे गेल्याचे स्पष्ट होत आहे. महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार रविवारी 594 जण कोरोना दगावले. कर्नाटकात 626 जणांचा बळी गेला. एका दिवसात कर्नाटकात कोरोने झालेले हे आतापर्यंतचे सर्वाधिक मृत्यू आहेत. तमिळनाडूमध्ये 422 जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशात 75 जण दगावले आहेत.

गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून आतापर्यंत देशात 2 कोटी 65 लाख 30 हजार रुग्ण आढळले आहेत. तर 2 कोटी 36 लाख 59 हजाराहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण मृत्यूंची संख्या तीन लाखांवर पोहोचली आहे.

देशात कोरोनामुळे झालेले सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्रात झाले असून राज्यात आतापर्यंत कोरोनाने झालेल्या 87 हजार 300 मृत्यूंची नोंद झाली आहे. तेच कर्नाटकात 24 हजार 658 जण दगावले आहेत. दिल्लीत 23 हजार, तमिळनाडूमध्ये 20 हजार, उत्तर प्रदेशात 19 हजार, पश्‍चिम बंगालमध्ये 14 हजार 200, पंजाबमध्ये 13 हजार 89 आणि छत्तीसगडमध्ये 12 हजार 494 जण आतापर्यंत दगावले आहेत.

तीन लाखांहून अधिक बळी गेलेला भारत तिसरा देश ठरला असून अमेरिकेत आतापर्यंत 5 लाख 89 हजार 703 जणांचा बळी गेला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 500 ते हजार मृत्यू दरदिवशी कोरोनाने होत आहेत. तेच ब्राझिलमध्ये आतापर्यंत 4 लाख 48 हजार 229 जणांचा बळी गेला आहे. सध्या ब्राझिलमध्ये दिवसाला दोन हजार रुग्ण कोरोनाने दगावत आहेत. शनिवारी ब्राझिलमध्ये 1900 जणांचा बळी गेला होता.

दरम्यान, अमेरिकेत कोरोनाच्या साथीमुळे गेलेले बळी घोषित असलेल्या संख्येपेक्षा कितीतरी जास्त असल्याची भीती याआधी व्यक्त झाली आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे सल्लागर अँथनी फॉसी यांनी अमेरिकेत बळींची संख्या प्रत्यक्षात 9 लाखांहून अधिक असल्याची शक्यता व्यक्त केली होती. तर अमेरिकेच्या ‘इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मॅट्रिक्स अ‍ॅण्ड इव्हॅल्युएशन’ (आयएचएमई) या गटानेही असाच दावा केला होता.

leave a reply