भारत व चीन लडाखच्या एलएसीचा वाद सामोपचाराने सोडविणार

- दोन्ही देशांची अधिकृत पातळीवर घोषणा

नवी दिल्ली – शनिवारी पार पडलेल्या भारत व चीनच्या लष्करी अधिकार्‍यांच्या चर्चेत लडाखच्या एलएसीचा वाद सामोपचाराने सोडवण्यावर एकमत झाल्याचे सांगितले जाते. दोन दिवसानंतर याबाबत दोन्ही देशांची अधिकृत प्रतिक्रिया आली. असे असले तरी लडाखच्या एलएसीवरील काही भागातून लष्कर मागे घेण्यास चीन अजूनही तयार नसल्याचे समोर आले आहे. त्याचवेळी सिक्कीमच्या एलएसीवर दोन्ही देशांच्या लष्करामध्ये हॉटलाईन सुरू करण्यात आली आहे.

भारत व चीन लडाखच्या एलएसीचा वाद सामोपचाराने सोडविणार - दोन्ही देशांची अधिकृत पातळीवर घोषणाअपेक्षेनुसार शनिवारी पार पडलेल्या नऊ तासांच्या चर्चेत लडाखच्या एलएसीवरील वाद सुटू शकलेला नाही. चीनने काही भागातून आपले लष्कर माघारी घेतले असले, तरी डेप्सांगमधून माघार घ्यायला चीन तयार नसल्याचे दावे केले जातात. भारताने या मुद्यावर आपली भूमिका अधिकच कठोर केली असून संपूर्ण माघारीखेरीज लडाखच्या एलएसीवरचा तणाव कमी होणे शक्य नसल्याचे या चर्चेच चीनला बजावले. इतकेच नाही तर चीनने एलएसीवर गेल्या वर्षाच्या एप्रिल महिन्यातील स्थिती प्रस्थापित केल्याखेरीज द्विपक्षीय संबंध सुरळीत होणार नाहीत, असे भारताने या चर्चेत चीनला खडसावले.

भारताच्या मागणीनुसार एलएसीवरून संपूर्ण माघार घेणे आपल्यासाठी मानहानीकारक ठरेल, असे चीनला वाटत आहे. याचा परिणाम चीनच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर होऊ शकतो. त्याचवेळी या क्षेत्रात आपले जवान तैनात ठेवून भारताबरोबरील संबंध अधिक बिघडविणे देखील चीनला परवडणारे नाही. त्यामुळे पुन्हा एकदा या आघाडीवर चीनची स्थिती मागे जाता येत नाही व पुढेही सरकता येत नाही, अशी झालेली आहे. म्हणूनच चीन हा सीमावाद स्थानिक लष्करी अधिकार्‍यांवर सोपवून दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंध अधिक भक्कम करण्यावर भर द्यावा, अशी भूमिका मांडत आहे. पण ते शक्य नसल्याचे सांगून भारताने चीनचा हा डाव हाणून पाडला.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी नुकतीच भारताला भेट दिली होती. त्यांच्या या दौर्‍यानंतर भारताने चीनच्या विरोधातील आपली भूमिका अधिकच कठोर केल्याचा तर्क पाकिस्तानातील काही विश्‍लेषकांनी मांडला आहे. चीनला एकाचवेळी तैवान, जपान तसेच ऑस्ट्रेलिया या देशांकडून विविध पातळ्यांवर आव्हान दिले जात आहे. चीनचे इशारे धुडकावून ब्रिटनची विमानवाहू युद्धनौक क्विन एलिझाबेथ तैवानच्या आखातात गस्त घालणार आहे. युरोपिय महासंघानेही चीनच्या विरोधात पावले उचलण्याची तयारी केली असून नाटो देखील चीनच्या कारवाया धोकादायक असल्याचे दावे करीत आहे.

या सार्‍या परिस्थितीचा लाभ घेऊन भारताने चीनच्या विरोधात अधिक आक्रमक भूमिका स्वीकारण्याचा मुत्सद्दीपणा दाखविल्याचा दावा पाकिस्तानचे विश्‍लेषक करीत आहेत.

leave a reply