अफगाणिस्तानातील परिस्थितीवर भारताची चिंता

नवी दिल्ली – ‘गेल्या दोन दशकांच्या कालावधीत अफगाणिस्तानने जे काही कमावले आहे, त्याचे रक्षण करण्याची आवश्‍यकता आहे. शांत, समृद्ध आणि लोकशाहीवादी अफगाणिस्तान भारताला अपेक्षित आहे’, असे सांगून या देशात सुरू असलेला रक्तपात त्वरित थांबविण्यासाठी व्यापक संघर्षबंदी लागू करण्यात यावी, अशी मागणी भारताने केली आहे. कतारच्या दोहा येथे अफगाणिस्तानबाबत ‘ट्रॉयका प्लस’ची अर्थात अमेरिका, रशिया, चीनसह पाकिस्तानची बैठक सुरू असून याचे भारताला आमंत्रण देण्यात आले. या परिषदेपासून भारताला दूर ठेवण्यात आल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यावर पाकिस्तानने समाधान व्यक्त केले होते. त्यामुळे या परिषदेतील भारताचा सहभाग पाकिस्तानच्या नाराजीचा विषय बनला आहे.

अफगाणिस्तानातील परिस्थितीवर भारताची चिंतापरराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी अफगाणिस्तानबाबतच्या घडामोडींची माहिती देऊन त्यावर चिंता व्यक्त केली. भारताला अफगाणिस्तानात शांतता हवी आहे. यासाठी भारत अफागाणिस्तानातील सर्वच घटकांशी चर्चा करीत असल्याचे सूचक विधान बागची यांनी केले. मात्र याचे तपशील त्यांनी दिलेले नाहीत. दोहा येथील ‘ट्रायका प्लस’च्या बैठकीपासून भारताला दूर ठेवण्यात आल्याची चर्चा सुरू झाली होती व त्यावर पाकिस्तानने समाधान व्यक्त केले होते. अफगाणिस्तानात भारताची कुठलाही भूमिका असूच शकत नाही, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. मात्र 7 ऑगस्ट रोजीच कतारने या बैठकीचे भारताला आमंत्रण दिले होते आणि त्यानुसार भारताचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झालेले आहेत.

अफगाणिस्तानात भारताचे सुरक्षाविषयक हितसंबंध गुंतलेले असून या देशातील विकासप्रकल्पात भारताने तीन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. पण हे विकासप्रकल्प भारताचे आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरेल, ते अफगाणी जनतेचेच प्रकल्प आहेत, असा दावा परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी केला. त्याचवेळी भारत अफगाणिस्तानातील अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू व शीख समुदायाच्या सुरक्षेकडे अत्यंत गांभीर्याने पाहत असल्याची माहिती बागची यांनी दिली. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून अफगाणिस्तानबाबत ही विधाने केली जात असताना, तालिबानने पुन्हा एकदा भारताने अफगाणिस्तानातील संघर्षात कुणाचीही बाजू न घेता तटस्थ रहावे, अशी मागणी केली आहे.

तालिबानचे वर्चस्व वाढत असताना, भारताने अफगाणिस्तानचे चौथ्या क्रमांकाचे शहर असलेल्या ‘मझार-ए-शरीफ’मधील दूतावासातील कर्मचाऱ्यांना मायदेशी बोलावले होते. पण तालिबान कुठल्याही देशाच्या राजनैतिक कार्यालयांवर हल्ला चढविणार नाही, असे सांगून तालिबानच्या प्रवक्त्याने भारताला आश्‍वस्त करण्याचा प्रयत्न केला. पण भारताने अफगाणी लष्कराला पुरविलेली शस्त्रास्त्रे तालिबानच्या विरोधात वापरली जात आहेत, असे सूचक विधान करून तालिबानच्या प्रवक्त्याने भारताने या संघर्षात कुणाचीही बाजू घेऊ नये, अशी मागणी केली आहे.

leave a reply