भारत व युरोपिय महासंघाची धोरणात्मक चर्चा संपन्न

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची युरोपिय महासंघाच्या नेत्यांशी व्हर्चुअल चर्चा संपन्न झाली. भारत व महासंघामधील मुक्त व्यापारी कराराच्या वाटाघाटीवर झालेले एकमत हे या चर्चेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य मानले जाते. याद्वारे भारत व युरोपिय महासंघाच्या सहकार्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे, असे युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मायकेल यांनी म्हटले आहे. तर कोरोनाच्या दुसर्‍या साथीची लाट आलेली असताना, भारताला युरोपिय देशांनी केलेल्या सहकार्यासाठी भारताच्या पंतप्रधानांनी यावेळी आभार मानले.

युरोपिय महासंघाचे सध्याचे अध्यक्षपद पोर्तुगालकडे आहे. त्यामुळे पोर्तुगालने या व्हर्च्युअल परिषदेचे आयोजन केले. सदर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी पोर्तुगालचा दौरा करणार होते. मात्र कोरोनाच्या साथीमुळे हा दौरा रद्द करावा लागला. पण सदर व्हर्च्युअल बैठकीत युरोपिय महासंघाच्या भारताबरोबरील सहकार्याचा नवा अध्याय सुरू झाल्याचा विश्‍वास युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मायकेल यांनी व्यक्त केला. युरोपिय महासंघाचे सदस्य असलेल्या २७ देशांचे प्रमुख नेते या व्हर्च्युअल परिषदेत सहभागी झाले होते.

भारत व महासंघामध्ये व्यापार, गुंतवणूक आणि कनेक्टिव्हिटी अर्थात पायाभूत सुविधांच्या विविध प्रकल्पांसाठी सहकार्य व्यापक करण्यावर या परिषदेत सहमती झाली. भारत व युरोपिय महासंघामधील मुक्त व्यापारी करारावरील वाटाघाटी सुरू करण्याचा धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा निर्णय यावेळी घेण्यात आला. भारतीय उद्योगक्षेत्राने याचे स्वागत केले आहे. चीनबरोबरील गुंतवणूकविषयक करार स्थगित केल्यानंतर महासंघाने भारताबाबत घेतलेला हा निर्णय महासंघाच्या धोरणात झालेल्या बदलांचे संकेत देत आहे.

पुढच्या काळात भारताचे महासंघाबरोबरील सहकार्य वाढेल, तसेच युरोपिय महासंघाच्या सदस्यदेशांबरोबरील भारताचा व्यापार मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे दिसू लागले आहे. मुख्य म्हणजे युरोपिय महासंघाची भारतातील गुंतवणूक यामुळे प्रचंड प्रमाणात वाढू शकेल. कोरोनाची साथ आल्यानंतर जगाची फॅक्टरी मानल्या जाणार्‍या चीनवर उत्पादनासाठी विसंबून राहता येणार नाही, याची जाणीव युरोपिय देशांनाही झालेली आहे. म्हणूनच जागतिक पुरवठा साखळीत भारताला महत्त्वाचे स्थान देण्याची तयारी युरोपिय देशांकडूनही केली जात असल्याचे संकेत मिळत आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्या युरोपिय महासंघाबरोबरील व्हर्च्युअल चर्चेतून ही बाब प्रकर्षाने समोर आली. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी कोरोनाची साथ आलेली असताना, युरोपिय देशांनी भारताला केलेल्या सहकार्याचे स्वागत केले. तसेच भारताने कोरोनाच्या लसीला बुद्धिसंपदा कायद्यातून वगळण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेत सहभाग घ्यावा, यासाठी युरोपिय देशांना आवाहन केले. युरोपिय देशांमध्ये यावरून मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे महासंघाने यावर अद्याप स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. पण पुढच्या काळात भारताकडून केली जात असलेली ही मागणी डावलणे युरोपिय महासंघासाठीही अवघड जाऊ शकते.

leave a reply