ब्रिक्सच्या बैठकीत भारताकडून पाकिस्तानचा पर्दाफाश

नवी दिल्ली – ब्रिक्स देशांच्या बैठकीत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी दहशतवादापासून असलेल्या धोका अधोरेखित केला. ‘लश्‍कर-ए-तोयबा’ आणि ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनांना एका देशाचे सहाय्य मिळत आहे, असे सांगून थेट नामोल्लेख न करता डोवल यांनी पाकिस्तानला लक्ष्य केले. तसेच दहशतवाद आणि अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात सहकार्याचे आवाहन यावेळी डोवल यांनी केले.

ब्रिक्सच्या बैठकीत भारताकडून पाकिस्तानचा पर्दाफाशअफगाणिस्तानात तालिबानची राजवट प्रस्थापित होत असताना, हा देश पुन्हा एकदा जागतिक दहशतवादाचे केंद्र बनेल, अशी जगभरातून व्यक्त होत आहे. तसे झाले तर याला सर्वस्वी पाकिस्तान जबाबदार असेल, हे भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर आक्रमकपणे सांगत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत अफगाणिस्तानविषयक बैठकीत भारताने हे ठासून सांगितले होते. त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर दुजोरा मिळत आहे. आता भारत, चीन, रशिया, ब्राझिल आणि दक्षिण आफ्रिका सदस्य असलेल्या ब्रिक्सच्या बैठकीतही भारताने पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा मांडला.

लवकरच ब्रिक्सची परिषद होईल व याचे यजमानपद भारताकडे आहे. त्याच्या आधी ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची व्हर्च्युअल बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात थेट नामोल्लेख न करता ‘लश्‍कर’ व ‘जैश’च्या दहशतीमागे पाकिस्तानचे पाठबळ असल्याचे लक्षात आणून देऊन डोवल यांनी पाकिस्तानचा पर्दाफाश केला. याच दरम्यान, सोशल मीडियावर अजित डोवल यांनी अफगाणिस्तानच्या भवितव्याबाबत 2013 साली केलेल्या विधानांचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. अफगाणी लष्कर संघटीत नाही व हे लष्कर तालिबानसमोर टिकाव धरणार नाही, असा निष्कर्ष डोवल यांनी या व्हिडिओद्वारे नोंदविला होता. पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी आपले बोलणे झाले व त्यांनीच आपल्याला ही माहिती दिल्याचे डोवल यांनी या व्हिडिओत म्हटले होते.

त्याचा दाखला देऊन डोवल यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदावर नसताना नोंदविलेला निष्कर्ष तंतोतंत खरा ठरला, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचा जगभरात पर्दाफाश करण्याचे भारताच्या धोरणाचा फार मोठा फटका पाकिस्तानला बसत असून यामुळे आपल्या देशाची प्रतिमा धुळीला मिळाल्याची खंत पाकिस्तानी विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत. तसेच भारताच्या प्रचाराला आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिसाद मिळत असून यामुळे पुढच्या काळात पाकिस्तानला अधिकच बिकट परिस्थितीचा सामना करावा लागेल, असे या विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

leave a reply