भारत फ्रान्सबरोबर संरक्षणविषयक सहकार्य कराराच्या तयारीत

नवी दिल्ली – दोन महिन्यांपूर्वी भारताने अमेरिकेबरोबर ‘बेसिक एक्सचेंज अँड कोऑपरेशन अ‍ॅग्रीमेंट-बेका’करार करून आपले संरक्षणविषयक सहकार्य नव्या उंचीवर नेले होते. फ्रान्सबरोबरही अशाच स्वरुपाचा करार करण्याची तयारी भारताने केली आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल व फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे राजनैतिक सल्लागार इमॅन्युअल बन यांच्यात द्विपक्षीय चर्चा सुरू आहे. यात उभय देशांमधील सदर कराराचा मुद्दा अग्रस्थानी असल्याचे बोलले जाते. याबरोबरच फ्रान्स भारताला आणखी ३६ रफायल लढाऊ विमाने, स्कॉर्पिन पाणबुड्या व लष्करी वाहतुकीसाठी आवश्यक असलेली विमाने पुरविण्यासाठी उत्सुक असून याबाबतच्या करारावरही अजित डोवल व इमॅन्युअल बन यांच्यात चर्चा अपेक्षित आहे.

भारताचे फ्रान्सबरोबरील सर्वच आघाड्यांवरील सहकार्य दृढ व व्यापक बनत चालले आहे. यानुसार दोन्ही देशांनी परस्परांना व्यूहरचनात्मकदृष्ट्या महत्त्वाची माहिती पुरविण्याबाबतचा करार करण्याची तयारी केली आहे. डोवल व बन यांच्यामधील चर्चेत हा मुद्दा अग्रस्थानी असेल असे सांगितले जाते. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील फ्रान्सच्या हितसंबंधांना चीनपासून धोका निर्माण झाला आहे. विशेषतः या क्षेत्रातील फ्रान्सची सत्ता असलेल्या बेटांचे समुह चीनच्या निशाण्यावर आहेत. त्यामुळे फ्रान्स चीनबाबत अत्यंत सावध भूमिका घेऊन भारताबरोबरील संरक्षणविषयक सहकार्य अधिकाधिक भक्कम करीत आहे. यामुळे उभय देशांमध्ये होणार्‍या कराराचे महत्त्व वाढले असून याचा फार मोठा लाभ भारत व फ्रान्सच्याही नौदलाला मिळेल, असे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

याबरोबरच फ्रान्स भारताला आणखी ३६ रफायल लढाऊ विमाने पुरविण्यास उत्सुक असल्याच्या बातम्या येत आहेत. भारतीय वायुसेनेला लढाऊ विमानांची कमतरता भासत आहे. रफायलसारखी ३६ अत्याधुनिक लढाऊ विमानांचा खरेदी व्यवहार करून भारताने आपल्या वायुसेनेची क्षमता प्रचंड प्रमाणात वाढविली आहे. मात्र भारताला अजूनही लढाऊ विमानांची आवश्यकता असून पुढच्या काळात भारत फ्रान्सकडून आणखी ३६ रफायलची खरेदी करील, अशी चर्चाही सुरू झाली आहे. ही विमाने आधीपेक्षा कमी दरात पुरविण्यास फ्रान्स तयार आहे.

फ्रान्सच्या सहकार्याने भारताने देशांतर्गत स्कॉर्पिन पाणबुड्या विकसित केल्या आहेत. पुढच्या काळात भारतीय नौदलाला आवश्यकता असेल तर नव्या पाणबुड्यांसाठी ‘प्रोजेक्ट ७५आय’ अंतर्गत सहकार्य करण्याची तयारी फ्रान्सने दाखविलेली आहे. लष्करी वाहतुकीसाठी लागणारे ५६ विमाने व सहा बहुउद्देशिय, अवजड वाहतूक करणारी विमाने खरेदी करण्याची तयारी भारताने केलेली आहे. याच्या कंत्राटासाठी फ्रान्सने विशेष उत्सुकता दाखविली आहे. यासंदर्भात दोन्ही देशांमध्ये करार होण्याची दाट शक्यता वर्तविली जाते. दरम्यान, इमॅन्युअल बन आपल्या या भारतभेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर व परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे.

leave a reply