संयुक्त राष्ट्रसंघाच्या वाहनावर भारताने गोळीबार केल्याचे पाकिस्तानचे आरोप भारताने फेटाळून लावले

नवी दिल्ली – पाकिस्तानव्याप्त काश्मीरच्या सीमेवर गोळीबार करून भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या वाहनाला लक्ष्य केल्याचा कांगावा पाकिस्तानने सुरू केला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत आंतरराष्ट्रीय नियम पायदळी तुडवित असल्याचा ठपका ठेवून याचा निषेध नोंदविला आहे. पण संयुक्त राष्ट्रसंघाने पाकिस्तानच्या अपप्रचारातील हवाच काढून घेतली आहे. तर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी यासंदर्भात निवेदन प्रसिद्ध करून पाकिस्तानच्या आरोपात तथ्य नसल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही, आपल्या नियंत्रणात असलेल्या भूभागात राष्ट्रसंघाच्या वाहनाची सुरक्षा ही पाकिस्तानची जबाबदारी ठरते व या देशाने इतरांवर दोषारोप करण्याच्या ऐवजी आपली जबाबदारी पार पाडावी, असा टोला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने लगावला आहे.

पाकिस्तानव्याप्त काश्मीरच्या भूभागातील चिरीकोट सेक्टरमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या वाहनावर भारतीय लष्कराने गोळीबार केला. यात या वाहनाचे नुकसान झाल्याचा आरडाओरडा पाकिस्तानने सुरू केला होता. पाकिस्तानी लष्कराच्या ‘इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स’चे (आयएसपीआर) प्रमुख मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी सोशल मीडियावर या वाहनाचे फोटो टाकून खळबळ माजविण्याचा प्रयत्न केला. भारतीय लष्कराने अकारण संयुक्त राष्ट्रसंघाच्या वाहनाला लक्ष्य केल्याचे इफ्तिखार यांनी म्हटले होते. पाकिस्तानच्या माध्यमांनीही याला फार मोठी प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान इम्रान?खान यांनी देखील सोशल मीडियावर भारताचा निषेध नोंदविला आहे. आता संयुक्त राष्ट्रसंघानेच भारताने चढविलेल्या या हल्ल्याची गंभीर नोंद घेऊन कारवाई करावी, अशी मागणी पाकिस्तानकडून करण्यात येत होती.

मात्र संयुक्त राष्ट्रसंघाने पाकिस्तानच्या आरोपांना दुजोरा दिलेला नाही. राष्ट्रसंघाचे वाहन इथे पाहणी करीत असताना, यावर अपरिचित गोष्ट धडकली हे खरे आहे. पण हा भारतीय लष्कराने चढविलेला हल्ला होता, असे म्हणता येणार नाही. या हल्ल्यात कुणालाही इजा झालेली नाही, पण वाहनाचे नुकसान झाले, असे राष्ट्रसंघाच्या अधिकार्‍यांनी म्हटले आहे. यामुळे पाकिस्तानचा भ्रमनिरास झाला असला, तरी सारा जोर एकवटून पाकिस्तानचे सरकार, लष्कर व माध्यमे भारतावर दोषारोप करीत आहेत.
या प्रकरणी रविवारी निवेदन प्रसिद्ध करून भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानच्या अपप्रचाराला नेमक्या शब्दात उत्तर दिले. भारतीय लष्कराकडून हा हल्ला झालेला नाही. पाकिस्तान यासंदर्भात करीत असलेले आरोप निराधार व खोडसाळ आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या वाहनाला सुरक्षा पुरविण्याची आपली जबाबदारी पार पाडण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी पाकिस्तान भारतावर हे आरोप करीत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच पाकिस्तानने दुसर्‍यावर आरोप करण्यापेक्षा याची चौकशी करावी, असा टोला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने लगावला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भारत आपल्या देशात सर्जिकल स्ट्राईक करण्याच्या तयारीत असल्याचे दावे पाकिस्तान करीत आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत यावर चिंता व्यक्त केली होती. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांनीही भारत पाकिस्तानवर हल्ला चढविण्याच्या तयारीत असल्याचे दावे ठोकले होते. अंतर्गत आघाडीवर भारताला येत असलेले अपयश झाकण्यासाठी भारत पाकिस्तानवर हल्ला चढविण्याच्या तयारीत असल्याचा हास्यास्पद दावा कुरेशी व युसूफ यांनी केला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान वर्षभरापासून भारताच्या हल्ल्याची भीती व्यक्त करीत आले आहेत.

पाकिस्तानने आधीच याची माहिती उघड केल्यामुळे भारत हा हल्ला चढवू शकलेला नाही, असा दावा मोईद युसूफ यांनी केला आहे. मात्र पाकिस्तानचे विरोधी पक्षनेते सरकारचे हे दावे आपल्या विरोधात सुरू असलेले जनआंदोलन दडपण्यासाठी करीत असल्याची तक्रार करीत आहे.

leave a reply