भूतान-चीनमधील कराराची भारताने नोंद घेतली आहे

- भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

नवी दिल्ली – गेल्या कित्येक दशकांपासून भूतान आणि चीनमध्ये असलेल्या सीमावादावरील चर्चा गतीशील करण्यासाठी उभय देशांमध्ये गुरुवारी सामंजस्य करार पार पडला होता. भूतान व चीनमधील या सामंजस्य कराराची भारताने नोंद घेतलेली आहे, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव अरिंदम बागची यांनी स्पष्ट केले. भारत-भूतान आणि चीनची सीमा भिडलेल्या डोकलाममध्ये २०१७ साली भारत व चीनचे लष्कर एकमेकांसमोर खडे ठाकले होते. भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी पूर्णपणे भारत असून त्यामुळे चीन भूतानबरोबर करीत असलेल्या या कराराकडे भारत बारकाईने पाहत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया सूचक ठरते. भारताच्या मध्यस्थीशिवाय भूतान व चीनमध्ये करार होऊ शकतो, असे सांगून चीनच्या मुखपत्राने या करारावर समाधान व्यक्त केले. तसेच भूतानबरोबरील चीनच्या संबंधांमधून आता भारत बाजूला सारला जाणार असल्याचे दावेही चीनच्या सरकरी मुखपत्राने ठोकले आहेत.

भूतान-चीनमधील कराराची भारताने नोंद घेतली आहे - भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रियाभूतान हा सार्वभौम देश असूनही या देशाचे परराष्ट्र धोरण व इतर व्यवहार भारतच हाताळतो, असे सांगून हे भूतानच्या अधिकारांवर झालेले अतिक्रमण असल्याचा ठपकाही चीनच्या मुखपत्राने ठेवला. मात्र भारताने याला विशेष महत्त्व न देता केवळ दोन देशांमधील सामंजस्य करारावर आपली नजर असल्याचे म्हटले आहे.

१९८४ सालापासून भूतान व चीनमध्ये सीमावाद आहे. यावर गेल्या तीन दशकांपासून यावर चर्चा सुरू आहेत. सदर चर्चेतून फारसे काही निष्पन्न झालेले नाही. अशा परिस्थितीत गुरुवारी भूतान व चीनमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा पार पडली. यामध्ये भूतानचे परराष्ट्रमंत्री ल्योंपो टांडी दोर्जी तर चीनचे सहाय्यक परराष्ट्रमंत्री वू जियांघाओ यांच्यात ‘थ्री-स्टेप रोडमॅप’बाबत सामंजस्य करार पार पडला. यामुळे उभय देशांमधील सीमावादावरील चर्चा गतीमान होईल, असे भूतानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे.

या करारावर राजनैतिक शिष्टाचाराचा भाग म्हणून भूतानकडून अशा प्रतिक्रिया दिल्या जात असल्या, तरी प्रत्यक्षात चीनपासून असलेल्या धोक्याची भूतानला पूर्ण जाणीव आहे. शेजारी देशांचे भूभाग बळकावण्याची खोड जडलेला चीन, संधी मिळाल्यास भूतानचा भूभाग ताब्यात घेतल्यावाचून राहणार नाही. भूतानच्या उत्तरेकडील जाकारलूंग आणि पासामलूंग खोर्‍यांवर चीन आपला अधिकार सांगत आहे. त्याचबरोबर भारत व भूतानच्या सीमेवरील डोकलामवरही चीनने दावा केला होता. भारताच्या भक्कम संरक्षणमुळेच भूतान चीनपासून सुरक्षित राहिल्याचे २०१७ सालच्या डोकलाम येथील तणावानंतर स्पष्ट झाले होते.

२०१७ साली याच डोकलामचा ताबा घेण्यासाठी चीनने आपले लष्कर रवाना केले होते. भूतानच्या आवाहनानंतर भारताने आपले लष्कर डोकलामच्या सुरक्षेसाठी तैनात केल्यानंतर सदर वाद ७३ दिवसांपर्यंत चालला होता. भारताच्या या लष्करी सहाय्याचे भूतानने आभार व्यक्त केले होते. भारताने देखील भूतानबरोबरचे सहकार्य पुढे नेले असून लवकरच इस्रो भूतानसाठी स्वतंत्र उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. त्यामुळे भूतान व चीनमधील सामंजस्य करारापासून भारताच्या हितसंबंधांना विशेष धोका नसल्याचे स्पष्टपणे दिसते आहे.

leave a reply