‘पबजी’सह ११८ अ‍ॅप्सवर बंदी टाकून भारताचा चीनला दणका

नवी दिल्ली – लडाखच्या सीमेवर चीनबरोबरचा तणाव वाढत असताना केंद्र सरकारने बुधवारी मोठा निर्णय घेतला. देशातील विद्यार्थी आणि तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या पबजी अ‍ॅप्ससह नव्या ११८ अ‍ॅप्सवर बंदी टाकली असून यामध्ये चिनी अ‍ॅप्सची संख्या मोठी आहे. या मोबाईल अ‍ॅप्समुळे देशाच्या सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला धोका असल्याचे सांगून सरकारने ही कारवाई केली आहे. अ‍ॅप्सवरील या नव्या बंदीमुळे चीनला कोट्यवधी डॉलर्सचा फटका बसणार असल्याचे दावे केले जातात. याआधी गेल्या दोन महिन्यात भारताने चीनच्या १०६ अ‍ॅप्सवर बंदी टाकली.

११८ अ‍ॅप्सवर बंदी

भारतीय सैनिकांनी चीनच्या घुसखोर लष्कराला पँगाँग त्सो सरोवरच्या परिसरात चांगलाच दणका दिल्यानंतर, बुधवारी संध्याकाळी भारताने चीनला आर्थिक आघाडीवरही हादरवून सोडले आहे. भारतात कोट्यवधी युजर्स असणार्‍या चीनच्या लोकप्रिय मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी टाकण्यात आली आहे. ‘बॅन’चा शिक्का बसलेल्या या अ‍ॅप्सपैकी पबजी’वरील बंदी सर्वात मोठी घडामोड ठरली आहे. शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते नोकरदार वर्गापर्यंत सर्वांमध्ये क्रेझ असणार्‍या या चिनी अ‍ॅप्सचे भारतात तब्बल ३.३ कोटी एक्टिव्ह युजर्स आहेत. तर सदर अ‍ॅप आतापर्यंत पाच कोटी जणांनी डाऊनलोड केले आहे. केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, दरदिवशी सव्वा कोटीहून अधिक जनता या अ‍ॅप्सचा वापर करीत आहे.

 

११८ अ‍ॅप्सवर बंदी ११८ अ‍ॅप्सवर बंदी

 

या अ‍ॅप्सच्या वापराने चिनी कंपनीला किती आर्थिक फायदा झाला, याचे तपशील उघड झालेले नाहीत. पण या अ‍ॅप्सच्या वापरामुळे देशाच्या सुरक्षेला, सार्वभौमत्वाला धोका होता, म्हणून ही कारवाई केल्याचे सरकारने म्हटले होते. भारताच्या सायबरस्पेसच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्याची आवश्यकता होती, असेही स्पष्ट केले आहे. या सर्व चिनी अ‍ॅप्सचे वर्कर्स, कंपनी भारताबाहेर चीनमध्ये असून यामुळे भारतीय ग्राहकांचा डेटा चोरला जात असल्याचे सांगून पबजी व इतर अ‍ॅप्सवर कारवाई केल्याचे म्हटले आहे.

याआधी जून महिन्यात तर गेल्या महिन्यात केंद्र सरकारने एकूण १०६ अ‍ॅप्सवर बंदी टाकली होती. यामध्ये टिकटॉक, यूसी ब्राउजर, हेलो आणि शेअर इटसारख्या अ‍ॅप्स कारवाई केली होती. भारताच्या या कारवाईचे अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांकडूनही अनुकरण केले जात आहे. दरम्यान, या चिनी अ‍ॅप्सची मोठी इंडस्ट्री भारतात आहे. भारतातील मोबाईल युजर्सची संख्या कोट्यवधींमध्ये असून या अ‍ॅप्सच्या माध्यमातून चीन कोट्यवधी डॉलर्स कमावित असल्याचे बोलले जाते. म्हणून जून महिन्यात भारताने केलेल्या कारवाईवर चीनने चिंता व्यक्त केली होती.

leave a reply