अफगाणिस्तानच्या मुद्यावर भारताची अमेरिकेशी महत्त्वपूर्ण चर्चा

नवी दिल्ली – अफगाणिस्तानातील अस्थैर्यापासून भारताच्या सुरक्षेला आव्हान मिळेल, असे अफगाणिस्तानच्या भारतातील राजदूतांनी बजावले आहे. याची पूर्णपणे जाणीव असलेल्या भारताने अफगाणिस्तानातील परिस्थितीवर प्रमुख देशांशी राजनैतिक चर्चा सुरू केली आहे. ताजिकिस्ताच्या दुशांबेमध्ये नुकत्याच पार पडलेल्या परिषदेदरम्यान भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे अफगाणिस्तानविषयक विशेषदूत झल्मे खलिलझाद व अमेरिकेच्या राष्ट्रीय उपसुरक्षा सल्लागार एलिझाबेथ शेरवूड-रँडल यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

अफगाणिस्तानच्या मुद्यावर भारताची अमेरिकेशी महत्त्वपूर्ण चर्चातालिबानकडे अफगाणिस्तानच्या जवळपास 85 टक्के इतक्या भूभागाचा ताबा आल्याचे दावे केले जातात. तालिबानची आक्रमकता पाहता लवकरच अफगाणिस्तानचा ताबा तालिबानकडे जाईल, अशी दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तालिबानने सध्या तरी भारताच्या विरोधात न जाण्याचे आश्‍वासन दिले असले, तरी त्यावर विश्‍वास ठेवण्यासारखी परिस्थिती नसल्याचे संकेत मिळत आहेत. तालिबान पाकिस्तानी लष्कर व आयएसआयच्या आदेशानुसार काम करीत असल्याचे आरोप अफगाणिस्तानचे नेते करीत आहेत. यामुळे भारत व अमेरिकेच्याही अफगाणिस्तानातील सुरक्षाविषयक हितसंबंधांना गंभीर धोका निर्माण झाला आहे.

या पार्श्‍वभूमीवर, दुशांबेमध्ये आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. यावेळी भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेचे अफगाणिस्तानविषयक विशेषदूत झल्मे खलिलझाद व अमेरिकेच्या राष्ट्रीय उपसुरक्षा सल्लागार एलिझाबेथ शेरवूड-रँडल यांच्याशी अफगाणिस्तानातील परिस्थितीवर सखोल चर्चा केल्याचे सांगितले जाते. याचे तपशील उघड झालेले नसले, तरी भारत व अमेरिका अफगाणिस्तानातील घडामोडींकडे अत्यंत बारकाईने पाहत असल्याचे यामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेतले असेलही, पण याचा अर्थ अफगाणिस्तान सोडले असा होत नाही, याकडे जबाबदार विश्‍लेषक लक्ष वेधत आहेत. काही झाले तरी अमेरिका चीन व रशियासारख्या देशांना अफगाणिस्तानात आपला प्रभाव वाढविण्याची संधी देणार नाही, असे हे विश्‍लेषक आत्मविश्‍वासाने सांगत आहेत.

एका मर्यादेच्या बाहेर जाऊन तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबुल व इतर महत्त्वाची शहरे ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलाच, तर अमेरिका कुठल्याही क्षणी तालिबानवर हवाई हल्ले चढविल, असे पाकिस्तानचे पत्रकार नजम सेठी यांनी म्हटले आहे. यासाठी अमेरिकेने आपल्या विमानवाहू युद्धनौका सुसज्ज ठेवलेल्या आहेत, याकडे सेठी यांनी लक्ष वेधले. तसेच तालिबानने काबुलच्या दिशेने आगेकूच केली, तर अमेरिका तालिबानला सहाय्य केल्याचा ठपका ठेवून पाकिस्तानवर कठोर आर्थिक निर्बंध लादण्याच्या तयारीत असल्याचा दावा पाकिस्तानचे माजी राजनैतिक अधिकारी जफर हिलाली यांनी केला आहे. त्यामुळे अमेरिका केवळ संधीची प्रतिक्षा करीत असून एकदा का ही संधी समोर आली की तालिबानसह पाकिस्तानचाही घात करील, अशी चिंता हिलाली यांनी व्यक्त केली. या आघाडीवर भारत देखील अमेरिकेला पूर्णपणे सहकार्य करील, असा दावा पाकिस्तानच्या या माजी राजनैतिक अधिकार्‍यांनी केला आहे.

leave a reply