आव्हान मिळाल्यास भारताकडून मुखभंग करणारे प्रत्युत्तर मिळेल

- संरक्षणमंत्र्यांचा चीनला इशारा

नवी दिल्ली – शांतीप्रिय असलेला भारत कुणाकडेही डोळे वटारून पाहत नाही. मात्र आव्हान मिळाल्यानंतर मुखभंग करणारे प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सज्ज असतो, असे सांगून शेजारी देशांनी यातून बोध घ्यावा, असा संदेश संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी दिला. लडाखच्या एलएसीवर तैनात असलेल्या सैनिकांसमोर संरक्षणमंत्री बोलत होते. भारताने लडाखच्या एलएसीवर 50 हजार सैनिक तैनात केल्याच्या बातम्या येत आहेत. लडाखच्या एलएसीवरील डेप्सांग, हाटॅ स्प्रिंग, गोग्रा इथून आपले जवान माघारी घेण्यास चीन तयार नाही. त्या पार्श्‍वभूमीवर, भारताची नवी तैनाती, संरक्षणमंत्र्यांची लडाख भेट व त्यांनी दिलेला संदेश, याद्वारे चीनला सज्जड इशारे दिले जात आहेत.

आव्हान मिळाल्यास भारताकडून मुखभंग करणारे प्रत्युत्तर मिळेल - संरक्षणमंत्र्यांचा चीनला इशारालडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यावर भारत व चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाची सहमती झाल्याच्या बातम्या येत आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेनबिन यांनी एलएसी स्थीर असल्याचा दावा केला. त्याचवेळी दोन्ही देशांचे शब्द व कृती शांतता आणि परस्परांवरील विश्‍वास वाढविण्यासाठी उपकारक असावी, अशी अपेक्षा वेनबिन यांनी व्यक्त केली. भारताचे परराष्ट्रमंत्री व संरक्षणमंत्री थेट शब्दात चीनला इशारे देत आहेत. लडाखच्या एलएसीवरून आपले जवान मागे घेण्याची जबाबदारी चीन झटकत आहे, यावर बोट ठेवून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी चीनला धारेवर धरले होते. त्याचवेळी भारताने एलएसीवरील सुरक्षा कडेकोट करण्यासाठी आणखी 50 हजार सैनिक तैनात केले आहेत. थेट उल्लेख केलेला नसला, तरी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ही दोन्ही देशांमधील शांततेसाठी उपकारक बाब नसल्याचे सांगत आहेत.

या पार्श्‍वभूमीवर, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी लडाखच्या एलएसीवरील सैनिकांना संबोधित करताना, चीनला कडक शब्दात समज दिली. भारतीय सैन्य पराक्रमी आहे आणि त्याचवेळी संयम कधी दाखवायचा, याचीही जाणीव भारतीय सैन्याला आहे, असे सांगून संरक्षणमंत्र्यांनी गेल्या वर्षी गलवान खोर्‍यातील संघर्षात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. भारताने आत्तापर्यंत दुसर्‍या देशाची एक इंचभर जमीन ताब्यात घेतलेली नाही. भारत शांतीप्रिय देश असून इतरांकडे डोळे वटारून पाहण्यावर भारताचा विश्‍वास नाही. मात्र आव्हान मिळाल्यानंतर भारत त्याला मुखभंग करणारे प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असतो, असे संरक्षणमंत्री म्हणाले.

शेकडो वर्षांपासून भारताच्या शेजारी असलेल्या देशांनी यातून बोध घ्यावा, असे सूचक उद्गार राजनाथ सिंग यांनी काढले. याआधीही संरक्षणमंत्र्यांनी चीनला असाच इशारा दिला होता. गेल्या काही महिन्यांपासून भारत व चीनकडून एकमेकांच्या विरोधात वापरल्या जाणार्‍या भाषेत फार मोठे बदल झाल्याचे संकेत मिळत आहेत. चीन भारताने आपल्या भूमीत घुसखोरी केल्याचे आरोप करून आपली इंचभर भूमी देखील भारताला मिळू देणार नाही, असे दावे ठोकत आहे. त्याचवेळी भारत चीनला स्पष्ट शब्दात परिणामांची जाणीव करून देत आहे. सीमावाद कायम ठेवून देखील, भारत व चीन सहकार्य करू शकतात, असे चीनचे म्हणणे आहे. मात्र द्विपक्षीय सहकार्यासाठी सीमेवर सलोखा अपेक्षित असल्याचे भारत बजावत आहे.

लडाखच्या एलएसीवरील चीनचा हटवादीपणा कायम राहिला तर पुढच्या काळात चीनला याची अधिक मोठी किंमत चुकती करावी लागेल, याची जाणीव वेगवेगळ्या मार्गाने भारत चीनला करून देत आहे.लडाखच्या एलएसीवरील भारतीय सैन्याची सज्जता, क्षमता सिद्ध झाली असून यामुळे चीनला फार मोठा धक्का बसल्याचे समोर येत आहे. विशेषतः लडाखच्या हवामानाला तोंड देणे चीनच्या जवानांसाठी फार मोठी आव्हानात्मक बाब ठरली होती. म्हणूनच चीन आता आपल्या लष्कराची क्षमता वाढविण्यासाठी तिबेटमधील तरुणांची लष्करात भरती करीत आहे. त्यांचा वापर करून या क्षेत्रातील आपली क्षमता वाढविण्याच्या चिनी लष्कराच्या प्रयत्नांची भारताच्या संरक्षणदलप्रमुखांनीही नोंद केली होती. याद्वारे चीनने आपल्या लष्कराची अक्षमता मान्य केल्याचे संकेत संरक्षणदलप्रमुखांनी दिले होते.

leave a reply