अफगाणिस्तानच्या स्थैर्य व विकासासाठी भारत वचनबद्ध

- भारताच्या परराष्ट्र सचिवांची ग्वाही

नवी दिल्ली – अफगाणिस्तानचे राजदूत फरिद मामुंदजई यांनी भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रिंगला यांची भेट घेऊन अफगाणिस्तानातील सुरक्षाविषयक स्थितीची माहिती दिली. अफगाणिस्तानचे स्थैर्य व विकासासाठी भारत वचनबद्ध आहे, असे यावेळी परराष्ट्र सचिव श्रिंगला म्हणाले. अमेरिका अफगाणिस्तानातील सैन्य माघारी घेत असताना, अफगाणी लष्कराची पिछेहाट सुरू झाली असून तालिबानची या संघर्षात सरशी होत आहे. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानातील सर्वच विदेशी दूतावासांच्या सुरक्षेची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. भारतही अफगाणिस्तानातील दूतावास बंद करण्याच्या तयारीत असल्याचे दावे प्रसिद्ध झाले होते. मात्र यात तथ्य नसल्याचा खुलासा अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासाने केला आहे.

अफगाणिस्तानच्या स्थैर्य व विकासासाठी भारत वचनबद्ध - भारताच्या परराष्ट्र सचिवांची ग्वाहीतालिबान अफगाणिस्तानची अधिकाधिक भूमी ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातील सुरक्षाविषयक परिस्थिती गंभीर बनली असून सर्वच देश अफगाणिस्तानकडे बारकाईने पाहत आहेत. भारताने देखील अफगाणिस्तानातील आपल्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला होता. अफगाणिस्तानात सुमारे तीन हजार भारतीय असल्याचे सांगितले जाते. अफगाणिस्तानात असलेल्या इतर देशांच्या राजनैतिक अधिकारी, स्वयंसेवक तसेच विविध प्रकल्पांवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना आपल्यापासून धोका नसल्याचे तालिबानने जाहीर केले होते. तरीही अफगाणिस्तानातील आपल्या राजनैतिक अधिकारी, कर्मचारी व नागरिकांच्या सुरक्षेबाबत भारत सावधानता दाखवित आहे.

या पार्श्‍वभूमीवर, भारत अफगाणिस्तानातील आपले काही दूतावास बंद करण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. सूत्रांचा हवाला देऊन काही वृत्तसंस्थांनी भारतीय दूतावासाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना मायदेशी बोलावून घेतले जाईल, असे म्हटले होते. पण अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासाने या बातम्या निराधार असल्याचे जाहीर केले. सोशल मीडियावर अफगाणिस्तानातील भारतीय दूतावास बंद करण्याची योजना नाही, असा निर्वाळा दिला. मात्र या देशातील परिस्थितीवर आम्ही बारकाईने नजर ठेवून आहोत, असेही भारतीय दूतावासाने स्पष्ट केले.

दरम्यान, अफगाणिस्तानचे भारतातील राजदूत फरिद मामुंदजई यांनी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रिंगला यांची भेट घेतली. या भेटीत सध्या अफगाणिस्तानातील सुरक्षाविषयक स्थितीची राजदूत मामुंदजई यांनी श्रिंगला यांना कल्पना दिल्याचे सांगितले जाते. अफगाणिस्तानचे स्थैर्य व विकास यासाठी भारत वचनबद्ध आहे, असे सांगून परराष्ट्र सचिव श्रिंगला यांनी अफगाणी जनतेला आश्‍वस्त केले. तालिबानबरोबरील संघर्षात अफगाणी लष्कराची पिछेहाट होत आहे व यामुळे अफगाणिस्तानातील आपल्या हितसंबंधांचा विचार करून काही देशांनी तालिबानशी चर्चा सुरू केली आहे. यामध्ये भारताचाही समावेश असल्याचे दावे केले जातात. भारताचे परराष्ट्रमंत्री व तालिबानच्या नेत्यांमध्ये आपण चर्चा घडवून आणल्याचे कतारने जाहीर केले होते. पण भारताने व तालिबाननेही या चर्चेची बातमी उडवून लावली होती. तालिबान अफगाणिस्तानच्या सत्तेवर आल्यानंतर त्यापासून भारतालाही धोका संभवतो, असे अफगाणिस्तानच्या सरकारने बजावले आहे.

या पार्श्‍वभूमीवर, तालिबान हिंसा व बळाचा वापर करून अफगाणिस्तानात आपली सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे, यावर भारताने चिंता व्यक्त केली होती. अधिकृत पातळीवर भारताने आपण अफगाणिस्तानच्या सरकारच्या बाजूने ठामपणे उभे राहणार असल्याचीच भूमिका स्वीकारलेली आहे. तर भारताने अफगाणिस्तानबाबत तटस्थ भूमिका स्वीकारावी, अशी मागणी तालिबान करीत आहे. अफगाणिस्तानची समस्या सोडवायची असेल, तर या देशात शांतीप्रक्रिया सुरू व्हावी व त्यात केवळ अफगाणींचा सहभाग असावा, असे भारताचे म्हणणे आहे.

अफगाणिस्तानातील हिंसेचे मूळ पाकिस्तानात असून पाकिस्तानच इथल्या हिंसाचार व अस्थैर्याला प्रोत्साहन देत असल्याचा भारताचा आरोप आहे. तालिबानने पाकिस्तानचे वर्चस्व झुगारून अफगाणिस्तानच्या राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्याचा निर्णय?घेतला, तर तालिबानशीही चर्चा होऊ शकते, असे संकेत भारताकडून दिले जात आहे. भारत व तालिबानमधील संभाव्य चर्चेची शक्यताही पाकिस्तानचा थरकाप उडवित असल्याचे दिसत आहे. यामुळे अफगाणिस्तानातील आपले डावपेच धुळीला मिळतील, अशी भीती पाकिस्तानला वाटू लागली आहे.

leave a reply