आक्रमणाला सडेतोड प्रत्युत्तर देण्याचे सामर्थ्य भारताकडे आहे

- संरक्षणमंत्री राजनाथ सिंग

गुवाहाटी – ‘भारत शांततेचा पुजारी आहे. त्याचवेळी आक्रमणाला सडेतोड प्रत्युत्तर देण्याचे सामर्थ्यही भारताकडे आहे. गेल्या वर्षी लडाखच्या गलवानमधील संघर्षात भारतीय सैनिकांनी आपल्या धैर्य व पराक्रमाचे जबरदस्त प्रदर्शन केले होते. देशासाठी प्राणपणाने लढून बलिदान देणार्‍या सैनिकांना मी सॅल्युट करीत आहे’, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग म्हणाले. गलवानमधील संघर्षाला एक वर्ष पूर्ण होत असताना, भारतीय लष्कराने या संघर्षात बलिदान देणार्‍या शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. मात्र संरक्षणमंत्र्यांनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आसाममधील कार्यक्रमाचे औचित्य साधले.

आक्रमणाला सडेतोड प्रत्युत्तर देण्याचे सामर्थ्य भारताकडे आहे - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’ने (बीआरओ) ईशान्येकडील राज्यांना जोडणार्‍या सुमारे १२ रस्त्यांची बांधणी केली आहे. चीनलगतच्या सीमेजवळील हे रस्ते व्यूहरचनात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरतात. आसामच्या बिलगर येथे या रस्त्यांच्या राष्ट्रार्पणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्यासोबत संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून संरक्षणमंत्र्यांनी गलवानच्या शहिदांना आदरांजली वाहिली व त्यांच्या धैर्य आणि पराक्रमाला आपण सॅल्युट करीत असल्याचे म्हटले आहे. यावेळी भारताचे धोरण संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात मांडले. ‘भारत शांततेचा पुजारी आहे. मात्र आपल्यावरील आक्रमणाला सडेतोड उत्तर देण्याचे सामर्थ्य भारताकडे आहे’, असे सांगून राजनाथ सिंग यांनी भारताची शांतीप्रियता म्हणजे दुबळेपणा नसल्याची जाणीव करून दिली.

ईशान्येकडील राज्यांना एकमेकांशी अधिक घट्टपणे जोडणारे ‘बीआरओ’ने उभारलेले हे रस्ते २८५ किलोमीटर इतक्या लांबीचे आहेत. यातील एक रस्ता अरुणाचल प्रदेशच्या किमिनपासून आसामच्या पोतिनला जोडणारा आहे. तसेच इथला एक मार्ग लडाख व दुसरा जम्मूला जोडणारा असल्याचे सांगितले जाते. उरलेले नऊ रस्ते अरुणाचल प्रदेशच्या सीमाभागातील वाहतूक अधिक सुलभ करणारे आहेत. यातील पूर्वेकडील सीमेला जोडणारा रस्ता धोरणात्मकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असून तो ‘गेम चेंजर’ ठरेल, असा विश्‍वास संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला.

या रस्त्यांची बांधणी म्हणजे भारताने स्वीकारलेल्या ऍक्ट ईस्ट धोरणाचा भाग ठरतो, असा दावा संरक्षणमंत्र्यांनी यावेळी केला. तसेच बीआरओने २०१४ सालापासून ४,८०० किलोमीटर इतक्या रस्त्यांची बांधणी केली असून हा विक्रम ठरतो, याकडे राजनाथ सिंग यांनी लक्ष वेधले व यासाठी बीआरओची प्रशंसा केली. भारताच्या संरक्षणविषयक धोरणात गेल्या काही वर्षांपासून अत्यंत महत्त्वाचे बदल झाले आहेत. देशाने संरक्षणदलप्रमुखपदाची निर्मिती केली. तसेच देशासाठी आवश्यक असलेल्या शस्त्रास्त्रांची निर्मिती देशातच व्हावी व त्याची निर्यातही व्हावी, असे ध्येय सरकारने समोर ठेवले आहे, याचाही विशेष उल्लेख यावेळी संरक्षणमंत्र्यांनी केला.

दरम्यान, गलावनच्या संघर्षाला एक वर्ष पूर्ण होत असताना, ईशान्येकडील राज्यांमध्ये रस्त्यांची ही उभारणी म्हणजे भारताने चीनला दिलेला सज्जड इशारा ठरतो. अरुणाचल प्रदेश म्हणजे दक्षिण तिबेट असून तो आपला भाग ठरतो, असा चीनचा दावा आहे. पण चीनच्या या दाव्याची भारत पर्वा करीत नसल्याचे सदर रस्त्यांचे उद्घाटन करून भारताच्या संरक्षणमंत्र्यांनी दाखवून दिले आहे.

leave a reply