भारत-इस्रायलने कोरोना चाचणीसाठी ‘गेम चेंजर’ तंत्रज्ञान विकसित केले 

- इस्रायलच्या राजदूतांचा दावा 

नवी दिल्ली – भारत आणि इस्रायलने मिळून कोरोनाच्या चाचण्यांसाठी ‘गेम चेंजर’ तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाद्वारे सुपर रॅपिड टेस्ट करता येईल. विशिष्ट ट्युबमध्ये फुंकर मारून केवळ एका मिनिटात कोरोना संक्रमित रुग्णाची ओळख पटवता येईल, अशी माहिती इस्राईलचे राजदूत रॉन माल्का यांनी दिली आहे. यावरील संशोधन अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या एकूण ७० लाखांजवळ पोहोचली आहे. तसेच या साथीने दगावलेल्या रुग्णांची संख्या एक लाख सात हजारांच्या पुढे गेली आहे. त्याचवेळी देशात यासाठीचे आतापर्यंत ५९ लाख ५५ हजार रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा देशातील हा दर ८५.५२ टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे. मात्र देशात दिवसाला ७० हजाराहून अधिक नव्या रुग्णांची नोंद दर दिवशी होत आहे. गेल्या महिन्यात देशात दरदिवशी सुमारे ९० हजार नवे रुग्ण आढळत होते. त्या तुलनेत गेल्या काही दिवसांपासून नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण घटले आहे. ही दिलासादायक बाब असली तरी देशातील काही भागात नवे कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण कायम आहे. गेल्या आठवड्याभरात केरळ आणि कर्नाटकात नव्या रुग्णांच्या नोंदीत वाढ झाली आहे.

सध्या कोरोनावर विविध लसीवर काम सुरु आहे. नुकतीच डब्ल्यूएचओने डिसेंबरपर्यंत एखादी लस उपलब्ध होईल, असा अंदाज वर्तविला होता. तर गेल्या आठवड्यात केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी पुढील वर्षांच्या जून महिन्यात कोरोनाचे लसीकरण सुरु होऊ शकेल, असे म्हटले होते. यापार्श्वभूमीवर सध्यातरी कोरोनाच्या रुग्णांची ओळख लवकरात लवकर पटविणे महत्वाचे ठरत असून यासाठी जास्तीत जास्त चाचण्या करण्यावर भर दिला जात आहे. यादृष्टीने एक महत्वाची घोषणा इस्रायलच्या राजदूतांनी केली आहे.

भारत आणि इस्रायलने संयुक्तरीत्या कोरोनाच्या चाचण्यांसाठी चार तंत्रज्ञानाचे परीक्षण केले आहे. त्यासाठी भारतातून मोठ्या प्रमाणावर नमुने घेण्यात आले होते. यामध्ये ब्रेथ एनालयझर आणि व्हॉइस टेस्टचा समावेश आहे. यामुळे लगेचच चाचणीचा अहवाल मिळेल,असे माल्का म्हणाले. चाचणी करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीला एका विशिष्ट युट्यूब मधून फुंकर मारावी लागेल आणि त्यानंतर केवळ ३० ते ५० सेकंदात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाची पटवता येईल, हे माल्का यांनी अधोरेखित केले. तसेच भारतच कोरोना लसीचे सर्वात जास्त आणि वेगाने उत्पादन करू शकतो. कोरोना लसीचे उत्पादन केंद्र बनण्याच्या दृष्टीने भारतात सर्व सुविधा उपलब्ध आहेत असा विश्वास माल्का यांनी व्यक्त केला.

leave a reply