कोरोनाव्हायरसच्या विरोधात भारत-जपान सहकार्य महत्वाचे ठरेल

भारताच्या पंतप्रधानांचा विश्वास

नवी दिल्ली – कोरोनाव्हायरसची साथ ओसरल्यानंतर जगाला याच्या भीषण परिणामातून बाहेर काढण्यासाठी भारत आणि जपान यांचे धोरणात्मक सहकार्य तसेच जागतिक भागीदारी अतिशय उपकारक ठरेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.

जपानचे पंतप्रधान ॲबे शिंजो यांच्याशी फोनवरील चर्चेत पंतप्रधान मोदी यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे. पंतप्रधान ॲबे यांच्याबरोबर झालेल्या चर्चेची माहिती पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर दिली आहे.

कोरोनाव्हायरसची साथ ओसरल्यानंतर याच्या परिणामातून जगाला बाहेर काढण्यासाठी भारत व जपान यांच्यातील धोरणात्मक सहकार्य तसेच जागतिक भागीदारी नव्या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल. तसेच साऱ्या जगाला याचा लाभ मिळेल असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी पंतप्रधान मोदी व पंतप्रधान ॲबे यांच्यामध्ये या साथीमुळे जगासमोर खडी टाकलेली आव्हाने व त्यावरील उपाय योजना तसेच जागतिक व आशिया प्रशांत क्षेत्राची सुरक्षा यावरही चर्चा पार पडली. या साथीच्या तडाख्यातून आपल्या देशाच्या जनतेला वाचवण्यासाठी दोन्ही देशांनी केलेल्या प्रयत्नांचे उभय नेत्यांनी यावेळी कौतुक केले.

दरम्यान जपानने या साथीमुळे आलेल्या संकटांवर मात करण्यासाठी तब्बल ९९० अब्ज डॉलर्सचे पॅकेज घोषित केले आहे. इतकेच नाही तर चीन मधून बाहेर पडणाऱ्या जपानच्या कंपन्यांसाठी पंतप्रधान ॲबे यांच्या सरकारने २.२ अब्ज डॉलर्सचे अर्थसहाय्य घोषित केले आहे. तर जपानचे नियंत्रण असलेल्या एशियन डेव्हलपमेंट बँकेने कोरोनाव्हायरस या साथीचा मुकाबला करण्यासाठी भारताला सुमारे २.२ अब्ज डॉलर्सचे अर्थसहाय्य घोषित केले आहे.

leave a reply