अरुणाचल प्रदेशजवळील चीनच्या बांधकामाची भारताकडून गंभीर दखल

नवी दिल्ली – लडाखच्या एलएसीवर भारतीय सैन्यासमोर विशेष काही करू न शकलेला चीन, दुसरी आघाडी उघडण्यासाठी धडपडत आहे. अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर चीन गाव वसविण्याची तयारी करीत असून इथे चीनकडून घरांची उभारणी केली जात आहे. याबाबतची बातमी एका खाजगी वृत्तवाहिनीने प्रसिद्ध करून याचे सॅटेलाईट फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले होते. परराष्ट्र मंत्रालयाने यावर प्रतिक्रिया दिली असून चीनच्या या बांधकामावर भारताची नजर असल्याचे स्पष्ट केले. तसेच आपल्या सार्वभौमत्त्वाच्या रक्षणासाठी भारत आवश्यक ती पावले उचलत असल्याचे सांगून परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत देशाला आश्‍वस्त केले आहे.

बांधकामचीन या भागात घरांची उभारणी करीत आहे व अरुणाचल प्रदेशच्या एलएसीवर चीन गाव वसविण्याच्या प्रयत्नात आहे. सारिचू नदीच्या किनार्‍यावर चीनच्या या कारवाया सुरू आहेत. याची गंभीर दखल भारताने घेतलेली आहे. हा वादग्रस्त भूभाग ठरतो. या भूमीवर चीन सुमारे १०१ घरे उभारीत आहे. चीनकडून केल्या जात असलेल्या बांधकामावर भारताची फार आधीपासून नजर रोखलेली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.

चीन या क्षेत्रात बांधकाम करीत असताना, भारताने देखील आपल्या सीमेवर मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचा विकास सुरू केला आहे. यानुसार रस्ते, पूल इत्यादींची उभारणी करण्यात येत आहे. इथल्या जनतेला याचा लाभ मिळावा, यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असे सांगून परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भातील सरकारची भूमिका स्पष्ट केली. तसेच भारताच्या सार्वभौमत्त्वाला धक्का बसेल, अशा स्वरुपाची कारवाई करू नका, असे इशारे चीनला देण्यात आल्याची माहितीही परराष्ट्र मंत्रालयाने दिली.

दरम्यान, लडाखच्या एलएसीवर घुसखोरीचे सारे प्रयत्न विफल झाल्यानंतर, चीन एलएसीवर इतर ठिकाणी घुसखोरीचे प्रयत्न करून भारतावर दडपण आणण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. भारताच्या लष्कराने व वायुसेेनेने चीनच्या या हालचालींची शक्यता गृहित धरून त्याला उत्तर देण्याची जोरदार तयारी केलेली आहे. केवळ लडाखच नाही तर एलएसीवर सर्वच ठिकाणी भारतीय लष्कर सावध असल्याचे लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी नुकतेच जाहीर केले होते.

संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशच्या एलएसीला भेट दिली होती. तसेच वायुसेनाप्रमुख आरकेएस भदौरिया यांनीही अरुणाचल प्रदेशमधील वायुसेनेच्या हवाई तळांना भेट देऊन इथल्या संरक्षणसिद्धतेचा आढावा घेतला होता. त्यामुळे या क्षेत्रातील चीनच्या हालचालींकडे भारत अत्यंत बारकाईने पाहत असल्याचे स्पष्ट होते.

पुढच्या काळात चीन वेगवेगळ्या मार्गाने भारतावर दडपण टाकून सीमावादात आपली सरशी झाल्याचे चित्र उभे करण्याचा पूरेपूर प्रयत्न करील, असे सामरिक विश्‍लेषक सातत्याने बजावत आहेत. यासाठी चीनने भूतानलगतच्या सीमेवरील हालचालीही वाढविल्या होत्या. मात्र भारतीय सेनादलांनी भूतानच्या सीमेजवळील तैनाती वाढवून चीनला सडेतोड उत्तर दिले होते. आता अरुणाचल प्रदेशच्या एलएसीवरील चीनच्या हालचाली भारताला अधिकच सतर्क करणार्‍या आहेत.

अरुणाचल प्रदेश म्हणजे दक्षिण तिबेट असून त्यावर आपलाच अधिकार असल्याचे दावे याआधी चीनने ठोकले होते. इतकेच नाही तर या राज्यातील भारतीय नेत्यांच्या दौर्‍यांवर चीनने वेळोवेळी आक्षेप नोंदविला होता. मात्र चीनच्या दाव्यात काडीचेही तथ्य नसल्याचे सांगून भारताने त्याला महत्त्व देण्याचे नाकारले होते. या पार्श्‍वभूमीवर चीन अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर करीत असलेल्या कारवाया म्हणजे भारताबरोबरील सीमावाद अधिक तीव्र करण्याचा प्रयत्न ठरतो.

अशा कारवायांमुळे चीनचे भारताबरोबरील संबंध सुधारण्याची शक्यता अधिकच मावळत चालल्याची जाणीव भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनला करून दिली होती. ६२ सालच्या युद्धानंतर चीनने भारताचा विश्‍वास संपादन करून जे काही कमावले होते, ते सारे लडाखच्या एलएसीवर कारवाई करून चीनने गमावल्याची टीका परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केली होती.

leave a reply