तिबेटमध्ये लाईव्ह फायरिंग युद्धसराव करुन चीनची भारताला चिथावणी

नवी दिल्ली – प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव अधिक वाढवायचा नाही, असे मान्य करणार्‍या चीनने भारताबरोबरील तणाव कमी करण्याच्या ऐवजी तणाव वाढविणार्‍या हालचाली सुरू केल्या आहेत. तिबेटमध्ये चिनी लष्कराचा लाईव्ह फायर युद्धसराव संपन्न झाला. याचे फोटोग्राफ्स व व्हिडिओ प्रसिद्ध करुन चीन भारताला इशारा देत असल्याचे भारतीय वृत्तवाहिन्यांनी बजावले आहे. पण हा युद्धसराव नियोजित होता, असे स्पष्टीकरण देऊन चीनच्या संरक्षण मंत्रालयाने त्यावर सारवासारवीचा प्रयत्न केला.

लाईव्ह फायरिंग

ब्रिगेडिअर स्तरावरील चर्चेत चीनने लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अधिक जवान तैनात करणार नाही, असे मान्य केले होते. मात्र भारताने चीनवर जराही विश्वास ठेवू नये, भारताला गाफील ठेवून चीन लडाखच्या क्षेत्रात लष्करी मुसंडी मारल्यावाचून राहणार नाही, असा इशारा माजी लष्करी अधिकारी तसेच सामरिक विश्लेषक देत आहेत. गलवान संघर्ष व त्यानंतरच्या काळात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय सैनिकांनी वर्चस्व गाजविले होते. चीनच्या आक्रमकतेला भारत जबरदस्त प्रत्युत्तर देत आहे, ही बाब अमेरिकन संसद सदस्यांनी मान्य करुन यासाठी भारताची प्रशंसा केली होती.

अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया तसेच आग्नेय आशियाई देशांबरोबर चीनचा वाद विकोपाला गेला आहे, पण प्रत्यक्ष संघर्षात चीनच्या जवानांना ठार करण्याचा पराक्रम भारतीय सैन्याने करुन दखविला आणि आपण चीनच्या लष्करी सामर्थ्याची पर्वा करणार नसल्याचे सार्‍या जगाला दाखवून दिले. भारताने स्विकारलेल्या या कणखर भूमिकेचे पडसाद जगभरात उमटू लागले असून चीनच्या विरोधातील सूर अधिकच तीव्र बनत चालले आहे. त्यातच चिनी एप्सवर बंदी व चीनची निर्यात रोखणारे कठोर निर्णय घेऊन भारत सरकारने चीनला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील आगळीकीची मोठी आर्थिक किंमत चुकती करण्यासाठी भाग पाडले आहे.

भारताच्या या ठाम भूमिकेचे इतर देशांनीही अनुकरण करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भारताने स्वीकारलेल्या या ठाम भूमिकेचे पडसाद चीनच्या अंतर्गत राजकारणातही पडल्याचे दिसत आहे. राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी भारताबाबत स्वीकारलेल्या भूमिकेवर चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टिमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. आधीच्या काळात अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया या ‘क्वाड’ देशांबरोबर सहकार्य करुन चीनच्या विरोधात थेट आक्रमक भूमिका घेताना भारताला विचार करावा लागला होता. पण सीमेवर संघर्ष छेडून चीनने या क्वाड’च्या सहकार्यात समाविष्ट होण्याचा भारताचा निर्णय अधिकच पक्का झाला. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताचा चीनशी संघर्ष सुरू असताना ऑस्ट्रेलिया व जपान या देशांनी भारताबरोबर संरक्षण करार करुन चीनला धक्का दिला. पुढच्या काळात आपल्या विरोधातील हे सहकार्य निर्णायक ठरेल, याची जाणीव चीनला झाली आहे. या पार्श्वभूमीवर, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कुरघोडी करुन भारतावर मात केल्याचा संदेश चीनला सार्‍या जगाला द्यायचा आहे. यासाठी चीन संधीची प्रतिक्षा करीत आहे, हे भारताने कधीही विसरता कामा नये, असे माजी लष्करी व राजनैतिक अधिकारी निक्षून सांगत आहेत.

leave a reply