जागतिक उत्पादनक्षेत्राला आकर्षित करणाऱ्या देशांच्या यादीत भारत दुसऱ्या स्थानावर

नवी दिल्ली – जागतिक उत्पादनाचे केंद्र म्हणून भारत उदयाला येत असल्याचा आणखी एक संकेत मिळाला आहे. ‘कुशमन अँड वेकफिल्ड’ या मालमत्ता क्षेत्रातील कंपनीच्या ‘ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग रिस्क इंडेक्स’च्या यादीत भारत अमेरिकेला मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. एखाद्या देशात उत्पादनासाठी आवश्‍यक असलेली क्षमता व यासाठी अनुकूल असलेले वातावरण, याचा विचार करून जागतिक उत्पादनक्षेत्राला आकर्षित करणाऱ्या देशांची क्रमवारी निश्‍चित केली जाते. गेल्या वर्षी या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताला यावर्षी दुसरे स्थान मिळाले आहे.

जागतिक उत्पादनक्षेत्राला आकर्षित करणाऱ्या देशांच्या यादीत भारत दुसऱ्या स्थानावरचार मुलभूत गोष्टींचा विचार करून ही यादी तयार केली जाते. यामध्ये उत्पादन नव्याने सुरू करण्याच क्षमता व औद्योगिक वातावरणाचा समावेश आहे. या वातावरणामध्ये कुशल कामगारांची उपलब्धता तसेच बाजारपेठेशी जोडणीचा विचार केला जातो. उद्योग चालविण्यासाठी लागणारा खर्च आणि उद्योगाशी निगडीत धोके देखील ही क्रमवारी निश्‍चित करताना लक्षात घेतले जातात. राजकीय आणि आर्थिक तसेच पर्यावरणाशी निगडीत परिस्थितीचा यामध्ये समावेश आहे. या आघाड्यांवर भारताची कामगिरी अधिक सुधारली असून गेल्या वर्षी या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला भारत यावर्षी दुसऱ्या स्थानावर आला आहे.

या यादीत पहिल्या क्रमांकावर चीन असून तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका व त्यामागे कॅनडा, झेक प्रजासत्ताक, इंडोनेशिया, लिथुआनिया, थायलंड, मलेशिया आणि पोलंड यांचा या यादीत समावेश आहे. गेल्या काही वर्षांपासून भारताने आपले उत्पादन क्षेत्र विकसित करण्यासाठी पावले उचलली होती. त्याचे परिणाम दिसू लागले असून उत्पादन क्षेत्राशी निगडीत सोयीसुविधा व इतर आवश्‍यक गोष्टींचा विकास होत आहे. यामुळे भारतात येणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. त्याचवेळी कोरोनाची साथ आल्यानंतर, सध्या जागतिक पुरवठा साखळीचे केंद्र असलेल्या चीनला पर्याय आवश्‍यक असल्याची जाणीव जागतिक उद्योगक्षेत्राला झालेली आहे. भारत हा उत्पादन क्षेत्रात चीनला उत्तम पर्याय ठरतो, याची जाणीव आघाडीच्या देशांना झालेली आहे.

म्हणूनच सध्या ‘ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग रिस्क इंडेक्स’मध्ये चीन पहिल्या स्थानावर असला तरी भारताची या आघाडीवरील कामगिरी अधिक लक्षणीय ठरते. मात्र असे असले तरी भारताला जागतिक उद्योगक्षेत्रासाठी उत्पादन केंद्र म्हणून विकसित होण्यासाठी बरीच मजल मारावी लागेल, असे ‘कुशमन अँड वेकफिल्ड’च्या अहवालाने बजावले. विशेषतः कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारताचे उद्योगक्षेत्र प्रभावित झाले होते, याचा दाखला देऊन अशा आव्हानांवर मात करण्याची सिद्धता भारताने ठेवायला हवी, असा सल्ला ‘कुशमन अँड वेकफिल्ड’च्या या अहवालात देण्यात आला आहे.

कोरोनाच्या जागतिक महामारीनंतर चीनचे जगभरातील प्रमुख देशांबरोबरील संबंध ताणलेले आहेत. रशियाा अपवाद वगळता, चीनचे सर्वात मोठे व्यापारी भागीदार असलेले अमेरिका, जपान, युरोपिय महासंघ तसेच ऑस्ट्रेलिया चीनवर नाराज आहेत. यापैकी काही देशांबरोबर चीनचे व्यापारयुद्ध सुरू झाले आहे. याचा फार मोठा फटका चीनच्या अर्थव्यवस्थेला बसू लागला आहे. निर्यातप्रधान अर्थव्यवस्था असलेल्या चीनचे प्रमुख देशांबरोबरील हे मतभेद पुढच्या काळात अधिकच तीव्र होऊ शकतात. यामुळे जगाची फॅक्टरी अशी ओळख असलेल्या चीनमधून बहुराष्ट्रीय कंपन्या बाहेर पडू लागल्या आहेत. याचा लाभ भारताला मिळू शकतो. चीनमधून बाहेर पडणाऱ्या कंपन्यांसाठी भारत अनुकूल वातावरणाची निर्मिती करीत असून या आघाडीवर भारताला आत्तापर्यंत उत्तम प्रतिसाद मिळू लागल्याचे दिसत आहे.

ही चांगली सुरूवात ठरते, पण अजूनही भारताला उत्पादनाचे जागतिक केंद्र बनण्यासाठी खूप मोठ्या सुधारणा कराव्या लागतील, असे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. ‘कुशमन अँड वेकफिल्ड’च्या अहवालातही ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे.

leave a reply