पाकिस्तानच्या आरोपांना भारताचे सणसणीत प्रत्युत्तर

नवी दिल्ली – दहशतवादी हफीज सईद याच्या लाहोरमधील घराजवळ झालेल्या बॉम्बस्फोटामागे भारत असल्याचा कांगावा पाकिस्तानने केला होता. पाकिस्तानचे हे आरोप भारताने धुडकावले आहेत. ‘भारताच्या विरोधात अपप्रचार करून असे निराधार आरोप करणे ही पाकिस्तानसाठी नवी बाब ठरत नाही. दहशतवादाच्या मुद्यावर पाकिस्तानची ख्याती जगभर पसरलेली आहे. त्यामुळे असे आरोप करण्यापेक्षा पाकिस्तानने दहशतवाद्यांचा सुळसुळाट असलेल्या आपल्या घराची नीट व्यवस्था लावावी व दहशतवाद्यांवर विश्‍वासार्ह आणि पडताळणी करता येण्याजोगी कारवाई करावी’, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने फटकारले आहे.

पाकिस्तानच्या आरोपांना भारताचे सणसणीत प्रत्युत्तर23 जून रोजी लाहोरमधील जोहर टाऊन येथे बॉम्बचा स्फोट झाला होता. मुंबईवर 26/11चा भयंकर दहशतवादी हल्ला घडवून आणणारा ‘जमात-उल-दवा’चा म्होरक्या हफीज सईद याच्या घराजवळ झालेला हा स्फोट सिलेंडरचा होता, असे पाकिस्तानी यंत्रणा सांगत होत्या. मात्र स्थानिकांनी हा बॉम्बस्फोट असल्याचे माध्यमांना सांगितल्यानंतर पाकिस्तानच्या यंत्रणांना हा घातपात होता हे मान्य करावे लागेल. मात्र यानंतर काही दिवसांनी हा दहशतवादी हल्ला होता असे सांगून पाकिस्तानने याला भारत जबाबदार असल्याचे आरोप लगावले होते. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी याचे पुरावे आंतरराष्ट्री समुदायासमोर मांडण्याची घोषणा केली होती.

पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांनी या प्रकरणी एका भारतीयाला अटक केल्याचा दावा करून तो भारताची गुप्तचर यंत्रणा ‘रॉ’चा हस्तक असल्याचा ठपका ठेवला. पाकिस्तानचे हे आरोप भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी स्पष्ट शब्दात धुडकावले. दहशतवादाबाबतची पाकिस्तानची ख्याती सार्‍या जगभर पसरलेली आहे. त्यामुळे पाकिस्तानने असे खोटेनाटे आरोप करण्यात आपली शक्ती खर्च करण्यापेक्षा आपल्या देशातून उदयाला येत असलेल्या दहशतवाद्यांवर विश्‍वासार्ह व पडताळणी करता येण्याजोगी कारवाई करावी, असा टोला बागची यांनी लगावला.

पाकिस्तानच्या आरोपांना भारताचे सणसणीत प्रत्युत्तरपाकिस्तान उघडपणे दहशतवादाचे उदात्तीकरण करणारा देश आहे आणि हे या देशाच्या नेत्यांनीच उघडपणे मान्य केलेले आहे. ओसामा बिन लादेन याचा पाकिस्तानचे नेते शहीद असाच उल्लेख करतात, याकडे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी लक्ष वेधले. दरम्यान, पाकिस्तानच्या दहशतवादाचा मुद्दा भारताकडून उपस्थित केला जात असताना, इंटरपोलने हफीज सईदच्या विरोधात पुन्हा एकदा ‘रेड कॉर्नर’ नोटीस जारी केली आहे. याआधी 2009 साली इंटरपोलने हफीज सईदच्या विरोधात अशीच रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. आत्ताही भारताने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन इंटरपोलने ही नोटीस जारी केल्याचे समोर आले आहे.

जागतिक दहशतवादाचे केंद्र म्हणून कुख्यात असलेल्या पाकिस्तानने गेल्या काही महिन्यांपासून भारतावरच दहशतवादाचे आरोप करण्याचे सत्र सुरू केले आहे. पाकिस्तानातील दहशतवादी कारवायांमागे भारत असल्याचा दावा या देशाचे नेते व माध्यमे करीत आहेत. यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर मोहीम छेडण्याची तयारी पाकिस्तानने केलेली आहे. पण याला आंतरराष्ट्रीय समुदायाकडून प्रतिसाद मिळत नाही, अशी तक्रार पाकिस्तानची माध्यमे करीत आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने अधिक आक्रमकपणे भारताच्या विरोधात प्रचार करावा, अशी अपेक्षा पाकिस्तानातील भारतद्वेष्टे विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत. मात्र भारतावर दहशतवादाचे आरोप करणार्‍या पाकिस्तानचे मंत्री आपल्या देशात तालिबानी दहशतवाद्यांना आश्रय दिला जातो व त्यांची कुटुंबे पाकिस्तानातच आहे, याची जाहीर कबुली देत आहेत.

अशी बेताल वक्तव्ये व कारवाया यामुळे दहशतवादाचा पुरस्कार करणारा देश अशी पाकिस्तानची प्रतिमा बनलेली आहे. याला दुसरे कुणी नाही, तर पाकिस्तानच जबाबदार आहे, हे जबाबदार विश्‍लेषक लक्षात आणून देत आहेत.

leave a reply