भारत व सौदी अरेबिया संयुक्त युद्धसराव करणार

संयुक्त युद्धसरावनवी दिल्ली – लवकरच भारत व सौदी अरेबियाचे लष्कर संयुक्त युद्धसराव करणार आहेत. पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये होणार्‍या या युद्धसरावासाठी भारतीय लष्कराचे पथक सौदीला जाणार असून या वित्तीय वर्षातच सदर सराव संपन्न होईल. डिसेंबर महिन्यात भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे सौदीच्या भेटीवर गेले होते. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या युद्धसरावाला फार मोठे सामरिक महत्त्व आल्याचे दिसत आहे. भारताचा सौदी व इतर आखाती देशांमध्ये वाढत असलेला प्रभाव आपल्या देशासाठी घातक ठरत असल्याची चिंता पाकिस्तानचे माजी लष्करी अधिकारी व सामरिक विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत.

सौदी अरेबिया व संयुक्त अरब अमिरात (युएई) भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत आहेत. तसेच भारतीय मनुष्यबळ सौदी-युएईसह इतर आखाती देशांमध्ये कार्यरत आहे. इतकेच नाही तर भारताने सौदी तसेच युएईबरोबर धोरणात्मक सहकार्य दृढ करण्याच्या दिशेने वेगाने पावले उचलली आहेत, अशी चिंता पाकिस्तानकडून व्यक्त केली जाते. भारताचा सौदी-युएईवरील वाढता प्रभाव म्हणजे पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाचे अपयश ठरते, अशी ओरड या देशातील विश्‍लेषक करीत आहेत. तर पाकिस्तानच्या माजी राजनैतिक अधिकार्‍यांनी या अपयशाच खापर पंतप्रधान इम्रान?खान यांच्या फसलेल्या परराष्ट्र धोरणावर फोडले आहे.

या पार्श्‍वभूमीवर, भारत व सौदी अरेबियाच्या युद्धसरावाची बातमी प्रसिद्ध झाली आहे. गेल्या वर्षाच्या डिसेंबर महिन्यात भारताचे लष्करप्रमुख सौदी अरेबियाच्या भेटीवर गेले होते. या दौर्‍यात त्यांनी सौदीच्या लष्करी मुख्यालयाला भेट दिली होती. पुढच्या काळात भारत व सौदीमधील लष्करी सहकार्य दृढ होणार असल्याचे स्पष्ट संकेत यातून मिळाले होते. सौदी अरेबियाच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानचे सुमारे २० हजार जवान या देशात तैनात ठेवले जातात. पण पुढच्या काळात सौदी पाकिस्तानवर इतका विश्‍वास दाखविण्याची शक्यता नाही, अशी चिंता पाकिस्तानचे माजी लष्करी अधिकारी व्यक्त करीत आहेत.

भारताच्या सौदीमधील वाढत्या प्रभावामुळे अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानने आपले माजी लष्करी अधिकारी बिलाल अकबर यांची सौदीच्या राजदूतपदी नियुक्ती जाहीर केली होती. राजनैतिक अधिकार्‍यांना सौदीबरोबरील पाकिस्तानचे संबध दृढ ठेवण्यात आलेल्या अपयशामुळे सरकारला हा निर्णय घ्यावा लागल्याचे दावे केले जातात. तर काही पत्रकारांनी आता पाकिस्तानचे लष्करही सौदीबरोबरील संबंध सुधारू शकणार नाही, असा निर्वाळा दिला आहे.

पंतप्रधान इम्रान खान यांनी तुर्कीबरोबर संबंध वाढवून सौदी व युएईला दुखावले होते. त्याचे फटके पाकिस्तानला बसत आहेत. यामुळेच दोन्ही देशांनी पाकिस्तानला दिलेल्या कर्जाची रक्कम परत मागण्यास सुरूवात केली, याकडे हे पत्रकार लक्ष वेधत आहेत. अशा परिस्थितीत भारताबरोबरील सौदी अरेबियाचे दृढ होत चाललेले संबंध आणि उभय देशांमधील लष्करी सराव भारताचा आखातीवरील वाढता प्रभाव अधोरेखित करणारी बाब ठरते आहे.

leave a reply