पाकिस्तानच्या बेताल आरोपांना भारताचे खणखणीत प्रत्युत्तर

नवी दिल्ली – गेल्या महिन्यात पाकिस्तानच्या खैबर पख्तुनवाला प्रांतात झालेल्या बॉम्बस्फोटात चीनचे नऊ इंजिनिअर्स ठार झाले होते. हा स्फोट भारताची गुप्तचर संस्था रॉ व अफगाणिस्तानची गुप्तचरसंस्था ‘एनडीएस’ने घडवून आणल्याचा आरोप पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला. त्यावर भारताची प्रतिक्रिया आली असून हे आरोप खोटारडे असल्याचे भारताने म्हटले आहे. ‘क्षेत्रिय अस्थैर्याचे केंद्र आणि घोषित दहशतवाद्यांचे आश्रयस्थान असलेला पाकिस्तान, आपल्या कारवायांकडून जगाचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे’, असा टोला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने लगावला.

पाकिस्तानच्या बेताल आरोपांना भारताचे खणखणीत प्रत्युत्तर14 जुलै रोजी पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात चिनी इंजिनिअर्सला घेऊन जाणारी बस दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोटाद्वारे उडवून दिली होती. यात चीनच्या नऊ इंजिनिअर्ससह 12 जण ठार झाले. या बसच्या एसीमध्ये स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे दावे पाकिस्तानने केले होते. पण चीनने यावर जळजळीत प्रतिक्रिया दिल्यानंतर पाकिस्तानने ही बस बॉम्बस्फोटाद्वारे उडवून देण्यात आली होती, असे जाहीर केले. याबाबतच्या तपासावर पंतप्रधान इम्रान खान स्वतःहून लक्ष ठेवून असल्याचे सांगून पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनची मनधरणी केली होती. पण गुरुवारी एका पत्रकार परिषदेत बोलताना, पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी या घातपातामागे भारत व अफगाणिस्तान असल्याचा आरोप केला.

भारताची गुप्तचर संस्था ‘रॉ’ व अफगाणिस्तानची गुप्तचर संस्था ‘नॅशनल डायरोक्टरेट ऑफ सिक्युरिटी’ (एनडीएस) यांनी मिळून खैबर पख्तुनख्वामध्ये हा घातपात घडविला, असा आरोप कुरेशी यांनी केला. याआधीही लाहोरमधील कुख्यात दहशतवादी हफीज सईदच्या घराजवळ झालेल्या बॉम्बस्फोटामागे रॉचा हात असल्याचा आरोप पाकिस्तानने केला होता. याचे पुरावे असल्याची घोषणा करून पाकिस्तानने भारतविरोधात गरळ ओकली होती. मात्र पाकिस्तानच्या या आरोपांकडे कुणीही लक्ष दिले नव्हते. त्यामुळे पाकिस्तान आपल्यावर होणाऱ्या दहशतवादाच्या आरोपांची तीव्रता कमी करण्यासाठी भारतावर बेतालपणे आरोप करीत असल्याचे समोर येत आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पाकिस्तानच्या या अपप्रचाराला सणसणीत उत्तर दिले. ‘दहशतवादाच्या आघाडीवर पाकिस्तानची ख्याती आंतरराष्ट्री पातळीवर पोहोचलेली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या भारतविरोधातील या जहरी प्रचाराला कुणीही फारशी किंमत देणार नाही. भारताच्या विरोधात असा अपप्रचार करून क्षेत्रिय अस्थैर्याचे केंद्र आणि घोषित दहशतवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान असलेला पाकिस्तान आपल्या कारवायांकडून जगाचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे’, अशी चपराक बागची यांनी लगावली.

दरम्यान, पाकिस्तानने भारतावर हे आरोप केल्यानंतर त्यावर चीनकडून आलेली प्रतिक्रिया लक्षणीय ठरते. ‘कुठल्याही शक्तीने आपले भू-राजकीय हेतू साधण्यासाठी दहशतवादाचा वापर करणे चुकीचे ठरते व चीन त्याला विरोध करील’ अशी सावध प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चनयिंग यांनी दिली. यात त्यांनी भारताचा उल्लेख करण्याचे टाळले. पाकिस्तानचा निकटतम मित्रदेश असलेला व या हल्ल्यात आपल्या नऊ इंजिनिअर्स गमावणारा चीन देखील पाकिस्तानच्या आरोपांना दुजोरा देण्यास तयार नाही. या घातपाताच्या तपासात चीनचे पाठविलेले विशेष पथक देखील सहभागी झालेले आहे. तरीही पाकिस्तानने केलेल्या आरोपांना दुजोरा देण्याचे टाळून चीनने देखील पाकिस्तानच्या आरोपांना दुजोरा दिलेला नाही. ही बाब पाकिस्तानच्या आरोपात काडीचेही तथ्य नसल्याचे दाखवून देत आहे.

leave a reply