सदोष टेस्टिंग किट्स पाठविणाऱ्या चीनला भारताचा धक्का

नवी दिल्ली – भारतात सदोष रॅपिड टेस्टिंग किट्स पाठविणाऱ्या देशांना हे किट्स परत पाठविले जातील. तसेच या कीट्सचा एक पैसाही संबंधित देशांला चुकविला जाणार नाही, अशी कडक भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. चीनकडून आयात करण्यात आलेल्या अँटीबॉडी किट्स बद्दल आलेल्या तक्रारीनंतर देशभरातील रॅपिड टेस्टिंग्स थांबविण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. तसेच या प्रकरणाच्या चौकशीचे आणि आयात कीट्सच्या तपासणीचा निर्देश दिले होते. तपासणी अहवालानंतर रॅपिड टेस्टिंगबाबत पुढील निर्देश देण्यात येतील असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेने (आयसीएमआर) जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. याद्वारे भारताने सदोष किट्सचा पुरवठा करणाऱ्या चीनला कडक इशारा दिल्याचे दिसत आहे.

देशात कोरोनाव्हायरसच्या साथीचा सामना करण्यासाठी सरकार विविध पातळ्यांवर काम करीत आहे. देशात जास्तीत जास्त कोरोनाच्या चाचण्या करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. दरदिवशी एक लाख टेस्टिंग इतकी क्षमता वाढविण्याचे लक्ष्य समोर ठेवण्यात आले आहे. सध्या दिवसाला ३० हजारांहून अधिक चाचण्या होत आहेत. मात्र देशात कोरोनाच्या चाचण्या वाढविण्याच्या सरकारच्या या मोहिमेला खराब टेस्टिंग किट्समुळे धक्का बसला होता. एका अहवालानुसार सरकारने ३७ लाख अँटीबॉडी किट्स मागविल्या आहेत. चीन, दक्षिण कोरिया आणि सिंगापूर सारख्या देशातून या किट्स आयात करण्यात येत आहेत. यातील सुमारे सात लाख किट्स भारताला आतापर्यंत मिळाल्या आहेत. आतपर्यंत प्राप्त झालेल्या किट्स पैकी बहुतांश किट्स चिनी कंपन्यांच्याच आहेत.

गेल्या आठवड्यात चीनकडून पाच लाख टेस्टिंग किट्स भारताला मिळाले होते. या रॅपिड टेस्टिंग किट्सचा पुरवठा त्यानंतर काही राज्यांना करण्यात आला होता. मात्र या राज्यांकडून सदर टेस्टिंग किट्स सदोष निदान करीत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या टेस्टिंगद्वारे ९० टक्के अचूक निदान होणे अपेक्षित होते, मात्र केवळ ५.४ टक्के निदान बरोबर येत होते. यानंतर रॅपिड टेस्टिंग थांबिवण्याचे आदेश सरकारने दिले होते. यानंतर बरेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सरकारचे कोट्यवधीचा खर्च यामुळे पाण्यात गेल्याचे आरोप झाले. तसेच चीनने विश्वासहर्ता गमावली असताना चीनकडून या किट्स का मागविण्यात आल्या असे प्रश्नही विचारण्यात येत आहे. या प्रश्नांची उत्तरे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी शुक्रवारी दिली.

खराब टेस्टिंग किट्स कोणत्या का देशाच्या असेनात त्या संबंधित देशांना परत पाठविल्या जातील. चीनचाही यामध्ये समावेश होतो, असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी स्पष्ट केले. तसेच या कीट्सचे बिल अजून चुकते करण्यात आलेले नाही आणि खराब कीट्सचे पैसे चुकते केले जाणार नाहीत, असा खुलासाआरोग्यमंत्र्यांनी केला.

चीनकडून पुरविण्यात येत असलेल्या पीपीई आणि रॅपिड टेस्टिंग किट्स बद्दल जगभरातून तक्रारी येत आहेत. या आधी काही युरोपियन देशांनी खराब किट्स पाठविल्याबद्दल चीनवर सडकून टीका केली होती. तसेच या संकटाच्या काळात चीन सदोष किट्स आणि वैद्यकीय उपकरणांची विक्री करून फायदा उकळत असल्याचे गंभीर आरोप झाले होते. युरोपीय देशांनी सुमारे २० लाख टेस्टिंग किट्स परत पाठविल्या होत्या. या युरोपीय देशांनी परत पाठविलेल्या किट्स चीनने भारताला विकल्याचे आरोप सुरु झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भारताने ही सदोष रॅपिड टेस्टिंग किट्स परत पाठविण्याचा निर्णय घेऊन चीनला धक्का दिला आहे.

सदोष किट्स बाबत बातम्या समोर आल्यावर चीनने भारताला सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ज्या दोन चिनी कंपन्यांनी या किट्स पुरवठा केला, त्या कंपन्यांनी खराब टेस्टिंग कीट्सचा आरोप फेटाळून लावला होता आणि आपण गुणवत्ता तपासूनच हे किट्स पाठविल्याचा दावा केला होता. यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही प्रतिक्रिया आली आहे.

leave a reply