तैवानच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा ‘मिस्टर डेमोक्रसी’ असा उल्लेख करून भारताचा चीनला टोला

नवी दिल्ली/तैपेई – ‘तैवानचे माजी राष्ट्राध्यक्ष डॉ. ली तेंग हुई उर्फ मिस्टर डेमोक्रसी यांच्या निधनावर ‘तैपेई असोसिएशन ऑफ इंडिया’ तीव्र शोक व्यक्त करीत असून तैवानी जनतेच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत”, या शब्दात भारताने तैवानच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या मृत्यूवर प्रतिक्रिया नोंदविली. तैवानच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा ‘मिस्टर डेमोक्रसी’ असा उल्लेख करून भारताने चीनला टोला लगावल्याचे मानले जाते. भारत व चीनदरम्यान सीमारेषेवरील तणाव अद्यापही कायम असून, माघारीचे नाटक करणाऱ्या चीनकडून प्रत्यक्षात अतिरिक्त तैनाती सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर, भारताने कट्टर चीनविरोधी असणाऱ्या माजी तैवानी राष्ट्राध्यक्षांबद्दल प्रशंसोद्गार काढणे, लक्ष वेधून घेणारे ठरते.

India-Taiwanगुरुवारी ३० जुलै रोजी, तैवानचे माजी राष्ट्राध्यक्ष डॉ. ली तेंग हुई यांचे निधन झाले होते. १९८८ ते २००० अशी बारा वर्षे डॉ. ली तेंग हुई यांनी तैवानचे नेतृत्व केले. तैवानच्या जनतेला थेट राष्ट्राध्यक्ष निवडण्याचा अधिकार देऊन देशातील लोकशाही अधिक बळकट करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. डॉ. ली तेंग हुई यांनी, आपल्या कारकीर्दीत तैवानवरील चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचा प्रभाव कमी करणारे अनेक निर्णयही घेतले होते. त्यांच्याच कार्यकाळात भारताने १९९५ साली, ‘तैपेई असोसिएशन ऑफ इंडिया’ नावाने राजनैतिक कार्यालय सुरू केले होते.

ही पार्श्वभूमी लक्षात घेता, डॉ. ली तेंग हुई यांच्या निधनानंतर पाठविलेल्या शोकसंदेशात, भारताने ‘मिस्टर डेमोक्रसी’ असे गौरवोद्गार काढणे महत्त्वाचे ठरते. भारताने यापूर्वी तैवानच्या मुद्द्यावर उघड व सक्रिय भूमिका घेण्याचे टाळले होते. मात्र कोरोनाची साथ आणि चीनकडून सीमाभागात सुरू असणाऱ्या कारवायांनंतर भारत चीनसाठी संवेदनशील असणाऱ्या मुद्द्यांवर आक्रमक झाला आहे. त्यात तिबेट व हॉंगकॉंगसह तैवानच्या मुद्याचाही समावेश आहे.

India-Taiwanमे महिन्यात तैवानच्या राष्ट्राध्यक्षा ‘त्साई ईंग-वेन’ यांच्या शपथविधी सोहळ्याला भारताचे दोन संसद सदस्य ‘व्हर्चुअली’ उपस्थित होते. यावेळी भारताने दिलेल्या सदिच्छा संदेशात स्वातंत्र्य व लोकशाही यांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. डॉ. ली तेंग हुई यांच्या निधनानंतर पाठविलेला शोकसंदेशातही तैवानच्या लोकशाहीचा उल्लेख आहे. हा उल्लेख म्हणजे तैवानचे स्वातंत्र्य व लोकशाही नाकारणाऱ्या चीनच्या एकतंत्री कम्युनिस्ट राजवटीला दिलेली चपराक बसल्याचे मानले जाते. शोकसंदेश पाठविल्यानंतर, भारताने तैवानमधील आपल्या राजनैतिक कार्यालयाच्या आवारात डॉ. ली तेंग हुई यांचे स्मृतिस्थळ (मेमोरियल) उभारण्याचेही जाहीर केले आहे. हा निर्णय चीनला दिलेला अजून एक धक्का ठरतो.

गेल्याच महिन्यात भारताने गौरांगलाल दास या वरिष्ठ व अनुभवी राजनैतिक अधिकाऱ्यांची तैवानचे दूत म्हणून नियुक्ती केली होती. दास यांनी यापूर्वी चीन व अमेरिका या प्रमुख देशांमध्ये राजनैतिक अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. इतक्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तैवानचे दूत म्हणून नियुक्ती करण्याची पहिलीच वेळ ठरते.

leave a reply