भारताने लडाखमध्ये चीनच्या नव्या घुसखोरीचा डाव हाणून पाडला

नवी दिल्ली – भारतीय सैन्याने लडाखच्या पँगाँग त्सो सरोवरच्या दक्षिणेकडील टेकड्या ताब्यात घेऊन खोड मोडल्यानंतर चीनने पुन्हा एकदा लडाखमध्ये सैन्य घुसविण्याचा प्रयत्न करुन पाहिला. मात्र यावेळीही भारतीय सैन्याने चीनचा हा डाव हाणून पाडला. यामुळे बिथरलेला चीन भारताच्या आक्रमकतेमुळे उभय देशांमधील सीमावाद सोडविण्याच्या यंत्रणा कुचकामी ठरू लागल्याची तक्रार करू लागला आहे. चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने नेहमीप्रमाणे भारताला याच्या गंभीर परिणामांची धमकी दिली आहे.

घुसखोरीचा डाव

३०-३१ ऑगस्ट दरम्यान भारतीय सैनिकांनी घुसखोरी करू पाहणार्‍या चिनी जवानांना रोखून पँगाँग त्सो सरोवराच्या दक्षिणेकडे असलेल्या काला टॉप, हेल्मेट टॉप टेकड्या ताब्यात घेतल्या. ही मोक्याची ठिकाणे असून यामुळे भारतीय सैन्याला या क्षेत्रातील चीनच्या हालचालींवर नजर ठेवणे अधिक सोपे जाऊ शकते. या क्षेत्रात चीनच्या लष्कराने बसविलेले उच्च प्रतिचे कॅमेरे व टेहळणी करणारे उपकरणे भारतीय सैनिकांनी उखडून टाकल्याचे वृत्त आहे. भारतीय सैन्याची ही आक्रमक कारवाई चीनला अपेक्षित नव्हती. भारताचे संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी लष्करी कारवाईचा इशारा चीनला दिला होता. त्याकडे चीनने गांभीर्याने पाहिले नव्हते. काला टॉप, हेल्मेट टॉप या टेकड्या ताब्यात घेऊन भारतीय सैन्याने चीनला दिलेला इशारा प्रत्यक्षात उतरविला आहे.

भारताच्या या लष्करी कारवाईनंतर चीनचे मुखपत्र ग्लोबल टाईम्सने भारतावर आगपाखड सुरू केली. सोमवारी प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल टाईम्सच्या संपादकीयामध्ये चीनच्या विरोधात भारताची आक्रमकता वाढत असल्याची नोंद करण्यात आली आहे. चीन शांतिप्रिय देश आहे, पण भारत मात्र नाहक चीनच्या सीमेत घुसखोरी करुन तणाव वाढवित असल्याचा कांगावा ग्लोबल टाईम्सने या संपादकीयात केला आहे. तरीही चीनला भारताबरोबर संघर्ष अपेक्षित नाही, पण भारताच्या आक्रमकतेमुळे सीमावाद सोडविण्यासाठी दोन्ही देशांनी स्थापन केलेल्या यंत्रणा कुचकामी ठरू लागल्या आहेत. भारत अमेरिकेचे सहाय्य घेऊन चीनवर मात करण्याचे स्वप्न पाहत आहे. पण भारत व चीनच्या सामर्थ्यात फार मोठी तफावत आहे, असा दावा ग्लोबल टाईम्सने केला आहे.

चीनकडे अफाट सामर्थ्य असल्याचे दावे करणार्‍या याच संपादकियामध्ये, पाकिस्तानचा वापर करुन चीन भारताला जेरीस आणू शकतो, असेही बजावण्यात आले आहे. तसेच सीमेवर संघर्ष छेडल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल व त्याच्या मोबदल्यात चीनची इंचभरही जमीन भारताला मिळणार नाही, अशी धमकी या वर्तमानपत्राने दिली आहे. २०१७ साली डोकलाममध्ये झालेला वाद, गलवान व्हऍलीतील संघर्ष आणि आता पँगाँग त्सो सरोवराच्या क्षेत्रात झालेली चकमक लक्षात घेता चीनच्या सीमेवरील भारताची आक्रमकता मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे, याचीही नोंद ग्लोबल टाईम्सच्या या संपादकीयात करण्यात आली आहे.

डोकलाचा वाद व गलवान खोर्‍यातील संघर्ष, या दोन्ही वेळेस ग्लोबल टाईम्समधून भारताला गंभीर परिणामांच्या धमक्यांवर धमक्या देण्यात आल्या होत्या. पण प्रत्यक्षात या संघर्षाचे चीनलाच अधिक परिणाम भोगावे लागले. यामुळे चीनची लष्करी व आर्थिक पिछेहाट झाली होती. त्यामुळे ग्लोबल टाईम्समधून मिळणार्‍या चीनच्या धमक्यांकडे भारत गांभीर्याने पाहत नसून पुढच्या काळात भारत चीनच्या सामर्थ्याची पर्वा करणार नाही, असा कडक संदेश भारताकडून दिला जात आहे.

leave a reply