भारत वायुसेनेसाठी ५६ ‘सी-२९५’ विमाने खरेदी करणार

नवी दिल्ली – भारत स्पेनकडून ‘सी-२९५ एमडब्ल्यू’ ही अवजड मालवाहू्विमाने खरेदी करणार आहे. यासंबंधीच्या २१ हजार कोटी रुपयांचा (३ अब्ज डॉलस) हा करार असून ५६ ‘सी-२९५’ विमाने खरेदी करण्याच्या प्रलंबित प्रस्तावावर केंद्रिय मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. यासाठी स्पेनच्या एअरबस डिफेन्स ऍण्ड स्पेस आणि त्याची भारतीय भागिदार कंपनी टाटा ही विमाने पुरविणार आहे. यातील १६ विमाने ही थेट स्पेनकडून फ्लाय वे स्थितीत ४८ महिन्यांच्या आत पुरविण्यात येणार आहेत. तर ४० विमानांची भारतात टाटाच्या प्रकल्पात उभारणी होणार आहे. याशिवाय ऑफसेट कंत्राटाअंतर्गत या विमानांचे अनेक सुट्टे भाग भारतातच विविध कंपन्यांकडून बनवून घेतले जातील. त्यामुळे भारतात एअरोस्पेस इकोसिस्टिमला चालना मिळेल, असा दावा करण्यात येतो.

भारताची संरक्षणविषयक आव्हाने वाढत आहेत. या पार्श्‍वभूमीवर युद्धस्थितीत व इतर आपत्कालीन परिस्थितीत संरक्षण साहित्य, तसेच जवानांची वाहतूक करण्यासाठी अधिक अवजड वाहतूक विमानांची आवश्यकता आहे. सध्या भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात सी-१३०, एन-३२ विमानांसह एव्हरो-७३८ विमाने आहेत. एव्हरो-७३८ विमाने जुनाट झाली असून त्यांना लवकरच टप्प्याटप्प्याने सेवेतून निवृत्त केले जाईल. त्याची जागा स्पेनच्या एअरबस कंपनीची ‘सी-२९५’ ही लष्करी अवजड वाहतूक विमाने घेतील.

एअर बस आणि टाटामध्ये याआधीच भागिदारी झाली आहे. यानुसार एअर बसच्या विमानांच्या देखभालीचे कंत्राट टाटाकडे आहे. आता सुमारे ४० एव्हरो-७३८ विमाने ही टाटा भारतात बनविणार आहे. यामुळे टाटा कन्सोर्टियम ही कंपनी लष्करी विमाने तयार करणारी भारतातील पहिली खाजगी कंपनी ठरेल. यासाठी एअरबसबरोबर तंत्रज्ञान हस्तांतरण करार करण्यात येणार आहे. आतापर्यंत भारतात सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी हिंदुस्थान एअरोनॉटिक्सची (हल) या क्षेत्रात एकाधिकारशाही होती. ‘सी-२९५ एमडब्ल्यू’ ही विमानांची वाहतूक क्षमता ५ ते १० टन इतकी आहे.

leave a reply