भारत कुठल्याही स्वरुपाचा दहशतवाद खपवून घेणार नाही

न्यूयॉर्क – ‘जम्मू आणि काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर भारत व पाकिस्तानच्या लष्करामध्ये संघर्षबंदी झालेली आहे. या संघर्षबंदीचे भारत स्वागत करतो. पण अजूनही या आघाडीवर बरेच काही करायचे आहे. दहशतवाद व त्याचे राजनैतिक पातळीवरील कुठलेही स्वरुप भारत खपवून घेणार नाही’, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी बजावले.

दहशतवादभारताशी चर्चा करण्यासाठी पाकिस्तान उत्सुक आहे. पण त्यासाठी भारताने जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० मागे घेण्याचा निर्णय बदलावा, असे तुणतुणे पाकिस्तान वाजवत आहे. भारताबरोबर चर्चा करण्यासाठी मध्यस्थी करा, असे साकडे पाकिस्तान अमेरिकेला घालत आहे. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांनी जीनिव्हा येथे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची भेट घेतली होती. या भेटीतही भारताबरोबरील पाकिस्तानच्या संबंधांवर चर्चा झाल्याची दाट शक्यता समोर येत आहे.

या पार्श्‍वभूमीवर, भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दहशतवादाच्या आघाडीवर पाकिस्तानला अजूनही बरेच काम करायचे आहे, याची जाणीव आपल्या अमेरिका दौर्‍याच्या सुरुवातीलाच करून दिली. पाकिस्तानलाच दहशतवादाची फार मोठी किंमत चुकती करावी लागली व याचे किती मोठे परिणाम पाकिस्तानी समाज भोग आहे, याचा या देशाने विचार करावा, असा टोला भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी लगावला. अशा परिस्थितीत पाकिस्तानात भारताबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्यावर विचार सुरू आहेत, हे महत्त्वाचे ठरते. पण यासंदर्भातील आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. कुठल्याही परिस्थितीत भारत दहशतवाद व त्याचे राजनैतिक स्वरुप खपवून घेणे शक्य नाही. या आघाडीवर पाकिस्तान कशी व किती प्रगती करतो, यावर पुढचा प्रवास अवलंबून असेल, असे संकेत परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी दिले. दरम्यान, पाकिस्तानबरोबरील संबंधांच्या मुद्यावर बायडेन प्रशासन भारतावर दडपण टाकण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.

अफगाणिस्तानातून सैन्यमाघार घेत असलेल्या अमेरिकेला पाकिस्तानात लष्करी तळ हवा आहे. या तळाच्या मोबदल्यात पाकिस्तान अमेरिकेकडे भारतावर दडपण टाकून काश्मीर प्रश्‍नावर आपल्याला अनुकूल भूमिका घेण्याचा सौदा करू शकेल. त्या पार्श्‍वभूमीवर भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेत पाकिस्तानबाबत मांडलेली ही भूमिका लक्षवेधी ठरते.

leave a reply