बोफोर्स तोफांसह चीन सीमेवर भारतीय लष्कराचा युद्धसराव

सिलिगुडी – चीनकडून सिक्कीममधील भारतीय सीमेनजीक तीन गावे उभारण्यात येत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर भारतीय लष्कराने सिक्कीममध्ये चीन सीमेनजीक युद्धसराव सुरू केला आहे. यामध्ये बोफोर्स तोफांचा वापर करण्यात येत आहे. चीनला लागून असलेल्या सीमेवर भारताने पूर्ण सज्जता ठेवली असून या भागात नियमीत युद्धसराव केले जात आहेत. दहा दिवसांपूर्वीच लडाखमध्येही सुमद्रसपाटीपासून 14 हजार फूट उंचीवर भीष्म व अजय रणगाड्यांद्वारे युद्धसराव पार पडला होता.

बोफोर्स तोफांसह चीन सीमेवर भारतीय लष्कराचा युद्धसरावलडाखमधील चीनची घुसखोरी, गलवानमधील संघर्ष यानंतर भारत-चीनमध्ये वाढलेला तणाव अजून कायम आहे. दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या 12 फेऱ्या पार पडल्या असल्या आणि तणाव कमी झाल्याचे चीन सांगत असला, तरी दुसऱ्या बाजूला चीनच्या चिथावणीखोर कारवाया सतत सुरू आहेत. लडाखच्या हॉट स्प्रिंग आणि डेप्सांग भागातून चीनने अजून आपले सैनिक मागे घेतलेले नाहीत. तर अरुणाचल प्रदेश, सिक्कीममधील सीमारेषेवरही चीन सातत्याने हालचाली करीत आहे. नुकतेच तिबेटमध्ये बुलेट ट्रेनच्या सहाय्याने सैनिकांना पोहोचवून आपण युद्धकाळात वेगाने सैनिकांना भारतीय सीमेपर्यंत पोहाचवू शकतो, असा संदेश देण्याचा प्रयत्न चीनने केला होता.

चीनच्या या चिथावणीखोर कारवायांना भारतीय लष्कर त्याच भाषेत संदेश देण्याचे काम करीत आहे. सध्या सिक्किम सीमेवर चीनकडून तीन गावे उभारण्यात येत असून या ठिकाणी तिबेटमधील नागरिकांना स्थायिक करण्यात येणार आहे. मात्र चीनकडून याचा वापर बंकर्स म्हणून करण्यात येईल. चीनकडून अतिशय चतुराईने या ठिकाणी बांधकाम करण्यात येत असल्याचे दावे करण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर सिक्कीममध्ये चीन सीमेनजीक भारताने युद्धसरावाचे आयोजन केले आहे. बोफोर्स तोफांसह करण्यात येत असलेला हा युद्धसराव हा नियमित सरावाचा भाग असल्याचे लष्कराकडून सांगण्यात येत असले, तरी चीनच्या लष्करी हालचालींच्या पार्श्‍वभूमीवर हा सराव आयोजित करण्यात आल्याचे स्पष्ट होते. तसेच उत्तर आणि पूर्व सीमेवरील स्थानिक रहिवाशांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करणे हासुद्धा युद्धसराव उद्देश आहे, असे वृत्त आहे. तसेच सिक्कीममध्ये भारतीय लष्कराने तैनातीही वाढविली आहे. सध्या उत्तर सिक्कीमधील लाचेन, लाचुंग आणि थांगू आणि पूर्व सीमेवरील शेरथग आणि कपूपमध्ये सैन्य तैनात करण्यात आले आहेत.

एफएच 77 बोफोर्सची मारक क्षमता 30 किलोमीटर इतकी आहे. या तोफांमधून 12 सेकंदात तीनवेळा मारा करता येतो. 2001 मध्ये ऑपरेशन पराक्रम दरम्यान या तोफांनी त्यांची मारक क्षमता सिद्ध केली आहे. ऑपरेशन पराक्रम दरम्यान या तोफांच्या सहाय्याने प्रतिदिन 80 ते 90 राऊंड डागण्यात आले होते. त्यामुळे शत्रूंच्या चौक्यांचे मोठे नुकसान झाले. अतिउंचीवर लढाऊ विमाने किंवा हेलिकॉप्टर देखील उपयोगी ठरत नाहीत. अशा ठिकाणी या बोफोर्स तोफा प्रभावी ठरल्या आहेत. यामुळे सिक्कीममधील चीन सीमेवरील युद्धसरावात भारतीय लष्कराकडून बोफोर्स तोफांचा वापर महत्वाचा ठरतो. यातून चीनला योग्य तो संदेश दिला जात आहे.

leave a reply