एलएसीवर भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज आहे – लष्करप्रमुख जनरल नरवणे यांचा चीनला इशारा

नवी दिल्ली – ‘लडाखच्या एलएसीवरील सर्वच भागातून चीनच्या लष्कराने माघार घेतल्याखेरीज इथला तणाव निवळणार नाही. भारतीय सैन्याला एलएसीवर शांती व सौहार्द अपेक्षित आहे. पण परिस्थिती उद्भवलीच कुठल्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी भारतीय सैन्य सुसज्ज आहे. एकतर्फी कारवाईने एलएसीवरील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न भारत खपवून घेणार नाही’, अशा खणखणीत शब्दात भारताच्या लष्करप्रमुखांनी चीनला नवा इशारा दिला. लडाखच्या एलएसीजवळील क्षेत्रात चीनचे लष्कर व हवाई दलाचा युद्धसराव सुरू असताना, भारताच्या लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी दिलेला हा इशारा लक्ष वेधून घेत आहे.

जनरल नरवणे

एलएसीच्या पूर्व लडाखनजिकच्या क्षेत्रात चीनने युद्धसराव सुरू केला आहे. तसेच भारताच्या एलएसीजवळ चीनने मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याची तैनाती सुरू केली आहे. सदर तैनाती व युद्धसरावाचा वापर करून चीन भारतावर दडपण वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. किंवा ही चीनच्या पुढच्या कारवाईची तयारीही असू शकते. या सार्‍या हालचालींकडे भारतीय सैन्य अत्यंत बारकाईने पाहत आहे. भारताचे वायुसेनाप्रमुख आरकेएस भदौरिया यांनी लेह येथील हवाई तळाला भेट देऊन इथल्या सज्जतेची पाहणी केली. चीनच्या लष्कर व हवाई दलाच्या सरावाच्या पार्श्‍वभूमीवर, वायुसेनाप्रमुखांची ही लेह भेट सामरिकदृष्ट्या महत्त्वाची ठरते.

तर लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी पुन्हा एकदा चीनला परिस्थितीची जाणीव करून दिली. लडाखच्या एलएसीवरील गोग्रा, हॉट स्प्रिंग आणि डेप्सांग या भागातून अजूनही चीनच्या जवानांनी माघार घेतलेली नाही. भारताने वारंवार मागणी करूनही चीन त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. मात्र या ठिकाणाहून चीनने माघार घेतल्याखेरीज लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी होणे शक्य नाही. दोन्ही देशांचा परस्परांवरील विश्‍वास कमी झाला असून एलएसीवर पुन्हा शांतता व सौहार्द प्रस्थापित करायचे असेल, तर या ठिकाणाहून चीनच्या जवानांना माघार घ्यावीच लागेल, असे जनरल नरवणे यांनी बजावले.

एलएसीवरील परिस्थिती एकतर्फी कारवाईने बदलण्याचा प्रयत्न भारतीय सैन्य कधीही खपवून घेणार नाही, असा इशाराही जनरल नरवणे यांनी दिला. सध्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी भारतीय लष्कर चिनी लष्कराच्या संपर्कात आहे. मात्र भारतीय लष्कराने कुठल्याही आव्हानाला तोंड देण्याची सज्जता ठेवली आहे, याचीही जाणीव जनरल नरवणे यांनी चीनला करून दिली. चीनकडून एलएसीवर सुरू असलेल्या कारवाया म्हणजे दबावतंत्राचा भाग ठरतो. आधीच्या काळात चीनने याचा मोठ्या चतुराईने वापर केला होता. पण सावध असलेल्या भारतीय सैन्यामुळे चीनला भारतावर दडपण टाकणे अवघड बनले आहे. उलट भारताने लडाखच्या एलएसीवर स्वीकारलेल्या कणखर भूमिकेमुळे चीनची तारंबळ उडाल्याचे स्पष्टपणे दिसते आहे.

भारतावर लष्करी दडपण टाकण्यात आपल्याला अपयश मिळत आहे, ही बाब चीनच्या वरिष्ठ नेत्यांना अधिकाधिक अस्वस्थ करीत असून कुठल्याही परिस्थितीत आपण भारतावर कुरघोडी केल्याचा संदेश चीनच्या नेतृत्त्वाला सार्‍या जगाला द्यायचा आहे. म्हणूनच एकीकडे भारताकडे व्यापारी सहकार्याची मागणी करणारा, चीन दुसर्‍या बाजूला एलएसीवर कुरापती काढत असल्याचे दिसते. मात्र जोवर एलएसीवरील तणाव कमी होत नाही, तोपर्यंत चीनने द्विपक्षीय संबंध व सहकार्य सुरळीत होईल, अशी अपेक्षा भारताकडून ठेवू नये, असे भारताने बजावले आहे.

राजकीय व लष्करी पातळीवर भारत चीनच्या विरोधात अशी कणखर भूमिका स्वीकारत असताना, त्याचा जागतिक प्रभाव दिसू लागला आहे. जपान व ऑस्ट्रेलियासह युरोपिय महासंघ देखील चीनच्या विरोधात कठोर भूमिका स्वीकारू लागल्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिकेवरही याचे दडपण येऊ लागले असून चीनधार्जिण्या मानल्या जाणार्‍या बायडेन प्रशासनालाही काही प्रश्‍नांवर चीनच्या विरोधात भूमिका स्वीकारणे भाग पडले आहे.

leave a reply