भारतीय लष्कर पूर्व लडाखमध्ये हिवाळ्यातही तैनाती कायम ठेवणार

नवी दिल्ली – भारत आणि चीनमध्ये वाढलेला तणाव लवकर कमी होईल, याची शक्यता फार कमी दिसत आहे. गलवानमधील संघर्षानंतर पूर्व लडाखमध्ये भारताने मोठ्या प्रमाणावर सैनिक, रणगाडे आणि इतर शस्त्रात्रे तैनात केली आहेत. चीनने ‘अक्साई चीन’मध्ये केलेली तैनाती आणि सीमेजवळील चीनच्या हालचाली पाहता भारतानेही दीर्घ तैनातीची तयारी केल्याचे वृत्त आहे. पूर्व लडाखमध्ये हिवाळ्यातील विपरीत स्थितीतही सध्याची तैनाती भारतीय लष्कर कायम ठेवणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Indian-Armyलडाखमधील तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये पुढील टप्पातील चर्चा लवकरच होणार आहे. मात्र चीनच्या सीमेवरील हालचाली पाहता येथील तणाव इतक्यात कमी होण्याची शक्यता कमीच दिसत आहे, असे लष्करी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. भारताने पॅंगोन्ग त्सो सरोवराच्या फिंगर ४ आणि फिंगर ८ या भागातून चीनला आपल्या जवानांना मागे घेण्यासाठी स्पष्ट शब्दात बजावले आहे. यासाठी दोन आठवड्यांची मुदत या आधीच्या बैठकीत भारताने दिली होती.

मात्र चीनकडून येथून आपले जवान मागे घेण्याच्या कोणत्याही हालचाली दिसत नसून सीमेलगत चीन तैनाती वाढवीत आहे. तसेच पॅंगोन्ग त्सो आणि ‘डेप्सांग’मध्ये चीनच्या जवानांची संख्या वाढली असून येथे पॅंगोन्ग त्सो सरोवर क्षेत्रात नव्या स्पीड बोटीही तैनात केल्याच्या बातम्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतानेही येथील तैनाती वाढविली आहे.

पूर्व लडाखमध्ये भारताने याधीच मोठ्या प्रमाणावर सैनिक, रणगाडे, तोफा आणि इतर शस्त्रास्त्रे तैनात केली आहेत आणि ही तैनाती चीनचा धोका ओळखून हिवाळ्यातही कायम ठेवण्यात येणार आहे, असे वृत्त अधिकाऱ्यांच्या हवाल्याने येत आहे. हिवाळ्यात या भागातील तापमान उणे २० डिग्री पेक्षा खाली जाते. मात्र सध्याची सीमेवरील परिस्थिती पाहून हिवाळ्यातील विपरीत परिस्थितीही, येथे चीनच्या कोणत्याही आगळिकीचा सामना करण्यासाठी तयारी ठेवण्याची योजना आखण्यात आल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. यासाठी जगातील सर्वात उंचावरील युद्धभूमी असलेल्या सियाचीनमध्ये तैनात जवानांप्रमाणे लडाखमध्ये तैनात जवानांना सुरक्षा साधने पुरविण्यात येणार आहेत, अशी माहितीही या अधिकाऱ्याने दिली.

leave a reply