एलएसीवर भारतीय सैन्य कुठल्याही आव्हानासाठी सज्ज

- संरक्षणदलप्रमुखांची ग्वाही

भारतीय सैन्यनवी दिल्ली – काही दिवसांपूर्वीच भारतीय सैन्याने शेजारी देशाच्या विस्तारवादी कारवायांना मुखभंग करणारे उत्तर दिले होते. भारताचे सार्वभौमत्त्व आणि सुरक्षेबाबत तडजोड केली जाणार नाही, असा संदेश याद्वारे भारताने दिलेला आहे, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले. तर सार्वजनिक लेखा समितीसमोर बोलताना संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी एलएसीवर भारतीय सैन्य कुठल्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याची ग्वाही दिली. वायुसेनाप्रमुख व्ही. आर. चौधरी यांनीही गेल्या वर्षी लडाखच्या एलएसीवर निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर वायुसेना अधिक चांगल्यारितीने सज्ज असल्याचे म्हटले आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून चीन एलएसीवर घुसखोरीचा सातत्याने प्रयत्न करीत असून भारताच्या विरोधात चिथावणीखोर कारवाया करीत आहे. अरुणाचल प्रदेशजवळील एलएसीवरील भागात चीन गाव वसवित आहे. उत्तराखंडमधील बारहोटी येथील एलएसीवर चीनच्या जवानांनी घुसखोरी करून इथे भारतीय सैन्य दाखल होण्याच्या आधी पोबारा केला होता. अरुणाचल प्रदेशच्या एलएसीवरही चीनच्या सुमारे २०० जवानांनी घुसखोरी केली, पण भारतीय सैनिकांनी त्याचे हे प्रयत्न वेळीच हाणून पाडले. याच्या बरोबरीने चीन एलएसीवर भारताच्या विरोधात प्रचंड प्रमाणात जवान तसेच संरक्षणसाहित्याची तैनाती करीत असल्याच्या बातम्या सातत्याने प्रसिद्ध होत आहेत. चीनने भारताच्या विरोधात प्रचारयुद्ध सुरू केले असून चीनची सरकारी माध्यमे व सोशल मीडियावर भारताच्या विरोधात अपप्रचार सुरू झालेला आहे.

अशा परिस्थितीत भारतही चीनला खरमरीत इशारे देत आहे. पोलीस दलाच्या एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी थेट नामोल्लेख न करता चीन व पाकिस्तानला खडसावले. काही दिवसांपूर्वीच शेजारी देशाच्या विस्तारवादी कारवायांना भारतीय सैन्याने मुखभंग करणारे प्रत्युत्तर दिले व या कारवाया हाणून पाडल्या. देशाचे सार्वभौमत्त्व आणि सुरक्षा याच्याशी तडजोड केली जाणार नाही, हा संदेश याद्वारे भारताने दिलेला आहे, असे नित्यानंद राय म्हणाले. अरुणाचल प्रदेशच्या एलएसीवर आपल्या शेकडो जवानांची घुसखोरी करू पाहणारा चीन व काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरून दहशतवाद्यांना घुसवू पाहणार्‍या पाकिस्तानला उद्देशून गृहराज्यमंत्र्यांनी हा इशारा दिल्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, सार्वजनिक लेखा समितीसमोर बोलताना संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी अरुणाचल प्रदेशच्या एलएसीवर कुठल्याही आकस्मिक आव्हानांचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज असल्याची ग्वाही दिली. यासाठी भारतीय सैनिकांना कठोर प्रशिक्षण देऊन, त्यांच्याकडून सातत्यपूर्ण सराव करून दुर्गम भागात वास्तव्यासाठी आवश्यक असलेली तयारी करून घेण्यात आलेली आहे, असे जनरल रावत म्हणाले. तर वायुसेनाप्रमुख व्ही. आर. चौधरी यांनी गेल्या वर्षी लडाखमध्ये निर्माण झालेल्या तणावानंतर वायुसेनेने आवश्यक ती खबरदारी घेतलेली आहे, अशी माहिती नवी दिल्लीत पार पडलेल्या एक कार्यक्रमात दिली.

गेल्या वर्षी वायुसेनेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांची लडाखसारख्या ठिकाणी वास्तव्यासाठी आवश्यक असलेली पूर्वतयारी करणे भाग असल्याचे लक्षात आले होते. यापासून धडा घेऊन वायूसेनेने याची तयारी केली असून आधीच्या तुलनेत वायुसेना या आव्हानासाठी अधिक सज्ज बनल्याचे सांगून वायुसेनाप्रमुखांनी त्यावर समाधान व्यक्त केले आहे.

leave a reply