भारताचे संरक्षणमंत्री रशियात दाखल

मॉस्को – भारत आणि चीनच्या सीमेवर तणाव वाढलेला असताना, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग बुधवारी रशियात दाखल झाले. रशियात संपन्न होणार्‍या ‘शघांय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन’च्या (एससीओ) बैठकीत संरक्षणमंत्री सहभागी होणार आहेत. या बैठकीत चीन आणि पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्याची भेट घेणार नसल्याचे सांगून भारताने याआधीच आपली भूमिका स्पष्ट केली होती. ऑक्टोबर महिन्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन भारताच्या भेटीवर येणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्र्याची ही रशिया भेट महत्त्वाची ठरते.

संरक्षणमंत्री

चार आणि पाच सप्टेंबर रोजी रशियात ‘एससीओ’ची बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग रशियाच्या भेटीवर आहे. या बैठकीला भारत आणि चीनच्या तणावाची पार्श्वभूमी आहे. या बैठकीदरम्यान ‘एससीओ’च्या सदस्यदेशांमध्ये दहशतवाद आणि कट्टरवाद या प्रमुख मुद्यांवर चर्चा पार पडणार आहे. तसेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंग रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईंगु यांची भेट घेणार असून यावेळी संरक्षणसहकार्यावर चर्चा पार पडेल. तसेच उभय देशांमध्ये काही महत्त्वपूर्ण करार होणार असल्याचे सांगितले जाते.

या वर्षीच्या अखेरपर्यंत भारत आणि रशियामध्ये ‘डिफेन्स लॉजिस्टिक्स’ करार होणार आहे. त्याआधी उभय देशांच्या संरक्षणमंत्र्यांमध्ये पार पडणारी ही बैठक महत्त्वाची ठरते. सोव्हिएत रशियाने दुसर्‍या महायुद्धात मिळविलेल्या विजयाला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने २४ जून रोजी रशियामध्ये भव्य संचलन पार पडले. यावेळी भारताच्या तिन्ही संरक्षणदलांनी शानदार संचलन केले. चीनबरोबरच्या गलवानमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी या काळातही रशियाला भेट दिली होती.

त्यावेळी रशियाने भारताला १२ ‘सुखोई-३०एमकेआय’ आणि २१ ‘मिग-२९’ अशी ३३ विमाने अल्पावधीत पुरविण्याची तयारी दाखवली होती. या भेटीत यावर चर्चा अपेक्षित आहे. तसेच रशियाकडून ‘एस-४००’ ही क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा लवकरात लवकर मिळावी यासाठी भारत प्रयत्न करीत आहे. त्याचवेळी रशियात पार पडणार्‍या युद्धसरावात भारत चीन आणि पाकिस्तानसोबत सहभागी होणार नाही. यामुळे पारंपरिक मित्रदेश रशिया दुरावू नये, यासाठी भारत प्रयत्न करीत आहे.

दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग रशियाच्या भेटीवर असताना, बंगालच्या उपसागरात भारत आणि रशियाच्या नौदलामध्ये ‘इंद्र-२०२०’ सागरी सराव पार पडणार आहे. कोरोनाव्हायरसच्या संकटामुळे या सरावात दोन्ही देशांचे जवान एकमेकांच्या संपर्कात येणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. भारत आणि रशियाच्या तीन विनाशिका या सरावात सहभागी होतील.

leave a reply