भारतीय अर्थव्यवस्था वेगाने विस्तारण्यासाठी सज्ज

-अर्थतज्ज्ञ आशिमा गोयल

नवी दिल्ली – कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या प्रभावातून बाहेर येऊन भारतीय अर्थव्यवस्था ज्या तेजीने पुर्ववत होण्याच्या दिशेने झेपावली तो वेग अपेक्षेपेक्षा जास्त होता. याद्वारे भारतीय अर्थव्यवस्थेचा अंतर्गत किती मजबूत आहे, हे स्पष्ट होते असे अर्थतज्ज्ञ आशिमा गोयल यांनी म्हटले आहे. येत्या काळात भारतीय अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करेल आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीचा हा अलेख दीर्घकाळ सुरू राहिल, असा विश्‍वास गोयल यांनी व्यक्त केला आहे.

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या सदस्य असलेल्या आशिमा गोयल यांनी भारतीय अर्थव्यवस्था वेगाने विस्तारण्यासाठी सज्ज असल्याचे एका मुलाखतीत म्हटले आहे. भारतीय अर्थव्यवस्था व्यापक असून तीची क्षमता अफाट आहे. तीचा पाया मजबूत असून देशात असलेल्या अफाट क्षमतेमुळेच गुंतवणूकदार येथे आकर्षित होत आहेत. इतर विकसनशील देशांची तुलना केल्यास इतर देशांना इतक्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांना आकर्षित करणे शक्य झालेले नाही, हे लक्षात येईल, ही बाबही गोयल यांनी अधोरेखित केली.

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा मोठा परिणाम अर्थव्यवस्थेवर पडला. पण या संकटातून अर्थव्यवस्था बाहेर आली आहे आणि दीर्घकाळ वाढीसाठी सज्ज झाली आहे, असा ठाम विश्‍वासही गोयल यांनी व्यक्त केला. सरकार पायाभूत सुविधा विस्तारण्यावर काम करीत आहे. त्याचवेळी थेट परकीय गुंतवणूकही मोठ्या प्रमाणावर येत आहे. याशिवाय कोणत्याही अस्थिरस्थितीशी सामना करण्याकरीत भारताजवळ पुरेशी गंगाजळी आहे, असे गोयल यांनी लक्षात आणून दिले.

यावर्षात भारतीय अर्थव्यवस्था 9.5 टक्के वेगाने प्रगती करेल, असा अंदाज रिझर्व्ह बँकेने व्यक्त केलेला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर विकासदराचा हा अंदाज 10.5 टक्क्यांवरून 9.5 टक्के करण्यात आला होता. तसेच जागतिक बँकेनेही भारतीय अर्थव्यवस्था 8.3 टक्के इतका विकासदर नोंदवेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. अर्थव्यवस्थेच्या विकासदराचे हे अंदाज जगात कोणत्याही इतर देशाच्या तुलनेत अधिक आहेत. ही बाबही गोयल यांनी अधोरेखित केली. तसेच डिजिटल करन्सीबाबत बोलताना व्यवस्थित आखणी करून आणलेल्या डिजिटल करन्सीचे असंख्य लाभ मिळतील, असे गोयल यांनी स्पष्ट केले.

भारतात पेमेंट सिस्टिम, बँकींग व्यवस्थेतील सुधार, गुंतवणूकदारांनासाठी सुलभ होत असलेले वातावरण व नियम, आर्थिक समावेशन, पारदर्शकता या बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत. तसेच ॲसेट मोनेटायझेशन पाईपलाईन प्रोग्राम देशात पायाभूत सुविधांच्या मजबूतीकरणासाठी महत्त्वाचे साधन ठरेल, असेही आशिमा गोयल यांनी म्हटले आहे.

leave a reply