भारतीय अर्थव्यवस्था जोरदार झेप घेण्याच्या तयारीत

- असोचॅमच्या महासचिवांचा विश्‍वास

भारतीय अर्थव्यवस्थानवी दिल्ली – कोरोनाच्या साथीतून सावरत असलेल्या भारताची अर्थव्यवस्था आता झेप घेण्याच्या तयारीत असल्याचा विश्‍वास ‘असोचॅम’ने (द असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया) व्यक्त केला आहे. असोचॅमचे महासचिव दीपक सूद यांनी हा विश्‍वास व्यक्त करीत असताना, डिसेंबर महिन्यात जीएसटी महसूलात झालेल्या लक्षणीय वाढीचा दाखला दिला. तसेच भक्कम वित्तीय बाजारपेठ आणि ग्राहकांचा बळावलेला विश्‍वास याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर दिसू लागल्याचा दावा दीपक सूद यांनी केला आहे.

डिसेंबर महिन्यात देशातील जीएसटीचा (गुडस् अँड सर्व्हिसेस टॅक्स) महसूल एक लाख १५ हजार कोटी रुपयांच्या पुढे गेल्याची बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली होती. हा आजवरचा सर्वाधिक जीएसटी ठरला आहे. भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा रूळावर येऊ लागल्याचे संकेत यामुळे मिळाले आहेत. त्याचा दाखला देऊन दीपक सूद यांनी भारतीय अर्थव्यवस्था ‘व्ही शेप’ अर्थात पुन्हा उसळी घेण्याच्या तयारीत असल्याचा विश्‍वास व्यक्त केला. घसरण झाल्यानंतर त्याच वेगाने अर्थव्यवस्थेच्या झालेल्या प्रगतीला ‘व्ही शेप रिकव्हरी’ म्हटले जाते. भारतीय अर्थव्यवस्था याच दिशेने पुढे जात असल्याचे सांगून त्यावर सूद यांनी समाधान व्यक्त केले आहे.

कोरोनाव्हायरसच्या विरोधात दोन लसींना देशात मंजुरी मिळाली आहे. लवकरच लसीकरणाची व्यापक मोहीम देशा सुरू होत आहे. या बाबतीत भारताने घेतलेली आघाडी देशाचा आत्मविश्‍वास अधिकच वाढविणारी ठरत आहे. याचा सुपरिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर पहायला मिळेल. तसेच कोरोनाच्या साथीमुळे फार मोठा फटका बसलेल्या उत्पादन व सेवा क्षेत्राला नजिकच्या काळात मोठी गती मिळेल, असे सूद पुढे म्हणाले. हॉटेल व्यवसाय, वाहतूक, मनोरंजन या क्षेत्रांना कोरोनाच्या साथीचा फार मोठा फटका बसला होता. पण पुढच्या काळात या क्षेत्रांना फार मोठा लाभ मिळाल्यावाचून राहणार नाही, असे असोचॅमच्या महासचिवांनी म्हटले आहे.

भारतीय अर्थव्यवस्था

अर्थव्यवस्थेबाबत हा विश्‍वास व्यक्त करीत असताना, दीपक सूद यांनी २०२१-२२ सालच्या अर्थसंकल्पाकडून अपेक्षा व्यक्त केली आहे. हा अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी फार मोठी भूमिका पार पाडेल, असा दावा सूद यांनी केला. या अर्थसंकल्पात आरोग्य, कृषी या क्षेत्रांकडे विशेष लक्ष पुरविण्यात येईल आणि मुख्यत्त्वेकरून मागणी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे दीपक सूद पुढे म्हणाले. आरोग्य क्षेत्राशी निगडीत असलेल्या हॉस्पिटल्स, वैद्यकीय शिक्षण, वैद्यकीय संशोधन व औषधनिर्मिती क्षेत्राला या अर्थसंकल्पाद्वारे मोठे प्रोत्साहन दिले जाईल, असे आपल्याला वाटत असल्याचे असोचॅमच्या महासचिवांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कोरोनाच्या साथीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेची गती खुंटलेली असली, तर भारतीय अर्थव्यवस्था पुढच्या काळात वेगाने रुळावर येईल, असा दावा आंतरराष्ट्रीय वित्तसंस्था व्यक्त करीत आहेत. यामुळेच आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार भारतावर अधिकाधिक विश्‍वास दाखवू लागले असून देशात येणार्‍या थेट परकीय गुंतवणुकीत (एफडीआय) लक्षणीय वाढ होत आहे. यामुळे भारताची परकीय गंगाजळीत ५८५ अब्ज डॉलर्सवर गेली असून या आघाडीवर भारत जगातील पाचव्या क्रमांकाचा देश बनला आहे. तसेच भारतीय अर्थव्यवस्था परकीय गंगाजळीच्या बाबतीत रशियाला मागे टाकून लवकरच चौथ्या स्थानावर येईल, असा दावा केला जातो. कोरोनाची साथ असताना गुंतवणूकदारांनी दाखविलेला विश्‍वास ही भारतासाठी फार मोठी जमेची बाजू ठरते.

leave a reply