संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांची दहशतवादी पाकिस्तानवर घणाघाती टीका

नवी दिल्ली – “अफगाणिस्तान तसेच भारताच्या विरोधात ‘लश्‍कर-ए-तोयबा’, ‘जैश-ए-मोहम्मद’सारख्या दहशतवादी संघटना बिनधास्तपणे कारवाया करीत आहेत. अशा दहशतवादी संघटनांचा पाहुणचार करून त्यांना उत्तेजन देणाऱ्या देशांचे हात रक्ताने माखलेले आहेत. अशा देशांचा पर्दाफाश करताना आपण डगमगता कामा नये”, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेला संबोधित करताना परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी थेट नामोल्लेख टाळून पाकिस्तानवर हा मर्मभेदी प्रहार केला. अफगाणिस्तानात तालिबानला मिळालेल्या यशामागे पाकिस्तान असल्याची चर्चा जगभरात सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांची ही टीका पाकिस्तानला महाग पडू शकते.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीला अध्यक्ष या नात्याने परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी संबोधित केले. दहशतवाद हा करोनाच्या साथीपेक्षा कमी धोका नाही. जोवर कोरोनाचा एक रुग्ण शिल्लक आहे, तोपर्यंत आपल्या सर्वांना असलेला धोका कायम आहे, असे मानले जाते. दहशतवादाबाबतही तसेच म्हणता येईल. दहशतवादापासून प्रत्येकजण सुरक्षित झाल्याखेरीज कुणीही सुरक्षित झाला, असे मानता येणार नाही, असा टोला जयशंकर यांनी यावेळी लगावला. भारताच्या शेजारी देशामध्ये ‘आयएसआयएल-के’ अर्थात खोरासान ही दहशतवादी संघटना योजनाबद्धरित्या विस्तार करीत आहे, याकडे परराष्ट्रमंत्र्यांनी लक्ष वेधले.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांची दहशतवादी पाकिस्तानवर घणाघाती टीकाअफगाणिस्तानात तालिबानची राजवट येत असताना, भारताने पहिल्यांदाच दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करून यावरून आंतरराष्ट्रीय समुदायाला हा इशारा दिला. ‘लश्‍कर’ व ‘जैश’ या पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटना भारत आणि अफगाणिस्तानच्या विरोधात उघडपणे कारवाया करीत आहेत. त्याला पाकिस्तानचे संपूर्ण सहकार्य मिळत आहे, हे थेट नामोल्लेख न करता परराष्ट्रमंत्र्यांनी सुरक्षा परिषदेच्या बैठकीत स्पष्ट केले. तसेच या दहशतवादी संघटनांना सहाय्य करणाऱ्या पाकिस्तानचे हात निष्पापांच्या रक्ताने माखलेले आहेत, असे सांगून जयशंकर यांनी भारताची भूमिका परखडपणे मांडली. अशा देशांचा पर्दाफाश करताना, आपल्याला डगमगून चालणार नाही, असा संदेश परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सुरक्षा परिषदेत दिला.

त्याचवेळी दहशतवादाच्या विरोधात कठोर भूमिका घेताना कुठल्याही प्रकारच्या सबबी पुढे करता येणार नाही. तसेच याबाबत चालढकलही करून चालणार नाही. दहशतवादाचे कुठल्याही प्रकारे समर्थन करण्याचे प्रयत्न हाणूनच पाडावे लागतील, असेही परराष्ट्रमंत्री जयशंकर पुढे म्हणाले. दहशतवादाच्या विरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवरील कारवाईला भारताचे नेहमीच संपूर्ण समर्थन असेल. तसेच दहशतवादविरोधी कारवायांसाठी सर्वच देशांनी आर्थिक सहाय्य करायला हवे, असे आवाहन यावेळी परराष्ट्रमंत्र्यांनी केले.

दरम्यान, सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष भारताकडून असून याच काळात सागरी सुरक्षा, अफगाणिस्तानचा प्रश्‍न तसेच दहशतवादाच्या विरोधात बैठकींचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी अफगाणिस्तानबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पाकिस्तानने विनंती करूनही या देशाला सहभागी करून घेण्यात आले नव्हते. याविरोधात पाकिस्तानने थयथयाट करून सुरक्षा परिषदेचा वापर पाकिस्तानविरोधातील प्रचारासाठी केला जात असल्याची टीका केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर, गुरुवारी पराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सुरक्षा परिषदेत ‘लश्‍कर’ व ‘जैश’ला सर्वतोपरी सहाय्य पुरविणाऱ्या पाकिस्तानवर केलेली टीका या देशाला चांगलीच झोंबणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

अफगाणिस्तानात तालिबान करीत असलेल्या क्रूर कारवायांमागे पाकिस्तान असल्याचे उघड झाले असून यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान अधिकच बदनाम झालेला आहे. लवकरच पाकिस्तानच्या विरोधात अमेरिकेला कारवाई करावी लागेल, असे संकेत मिळत आहेत. अशा काळात भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सुरक्षा परिषदेत पाकिस्तानवर केलेल्या या टीकेचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटण्याची दाट शक्यता आहे.

leave a reply