भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर युएईच्या बहुचर्चित दौर्‍यावर

नवी दिल्ली – भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) दौर्‍यावर आहेत. त्यांचा हा दौरा द्विपक्षीय असून परराष्ट्रमंत्री जयशंकर इतर कुणाच्याही भेटीगाठी घेणार नाहीत, असा खुलासा परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर युएईमध्ये असतानाच, पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी देखील या देशाला भेट देत आहेत. या दोघांची युएईमध्ये चर्चा पार पडेल, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र तशी शक्यता नसल्याचे भारत व पाकिस्तानकडूनही स्पष्ट करण्यात येत आहे. पण युएईने मात्र भारत व पाकिस्तानमध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी आपण मध्यस्थाची भूमिका पार पाडत असल्याचे जाहीर करून याबाबतचे कुतूहल अधिकच वाढविले आहे.

भारत व पाकिस्तानमध्ये अघोषित चर्चा सुरू असल्याच्या बातम्या ठरविक अंतराने प्रसिद्ध होत आहेत. काही दिवसांपूर्वी युएईच्या एका प्रभावशाली राजनैतिक अधिकार्‍याने आपला देश भारत व पाकिस्तानमधल्या चर्चेत मध्यस्थाची भूमिका पार पाडत असल्याचा दावा केला होता. त्या पार्श्‍वभूमीवर, परराष्ट्रमंत्री जयशंकर व परराष्ट्रमंत्री कुरेशी यांची युएई भेट चर्चेसाठीच आयोजित करण्यात आली असावी, अशी दाट शक्यता वर्तविण्यात येत होती. पण दोन्ही देशांनी याला नकार दिला आहे. त्यामुळे ही चर्चा गोपनीय असेल, असे दावे माध्यमांकडून केले जात आहेत. भारतात या बातमीला विशेष महत्त्व दिले जात नसले तरी पाकिस्तानमध्ये मात्र यावरून मोठा वाद सुरू झाला आहे.

भारताने काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० पुन्हा लागू केल्याखेरीज चर्चा शक्य नसल्याचा दावा पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केला होता. पण ते आपल्या वचनावर ठाम राहिलेले नाहीत, अशी टीका पाकिस्तानी पत्रकार व विश्‍लेषक करीत आहेत. काही दिवसांपूर्वी भारतातून साखर व कापूस यांची आयात करण्याची तयारी पाकिस्तानच्या सरकारने केली होती. मात्र याला विरोध होऊ लागल्यानंतर, पुन्हा एकदा पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी यु टर्न घेतले, असा आरोप माध्यमे करीत आहेत. अशा परिस्थितीत दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची युएईमध्ये भेट होण्याची शक्यता समोर आल्यानंतर, पाकिस्तानात इम्रान?खान यांच्यावर होणार्‍या टीकेची धार अधिकच वाढली आहे.

भारताने कलम ३७० पुन्हा लागू करण्याची शक्यता निकालात काढली आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानने भारताशी चर्चा सुरू केली, तर त्यातून पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा सोडून दिला, हा संदेश जगाला मिळेल. ही बाब पाकिस्तानसाठी घातक ठरेल, असा इशारा भारतद्वेष्टे विश्‍लेषक देत आहेत. तर पाकिस्तानने काहीही केले तरी भारत कलम ३७० पुन्हा लागू करणार नाही. आंतरराष्ट्रीय समुदाय भारताच्या विरोधात जायला तयार नाही. आत्तापर्यंत काश्मीरसाठी उघड आणि छुपे युद्ध करूनही पाकिस्तानच्या हाती काहीच लागले नाही. उलट यामुळे पाकिस्तानचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे भारताशी चर्चा करून आपली अर्थव्यवस्था सावरण्याखेरीज पाकिस्तानसमोर दुसरा पर्याय नसल्याचे या देशातील बुद्धिमंतांचे म्हणणे आहे.

आत्ता भारताशी चर्चा करण्यासाठी उत्सुकता दाखविणार्‍या पंतप्रधान इम्रान?खान यांनी आधीच्या काळात भारताच्या विरोधात जहाल भूमिका स्वीकारली होती. त्यापासून माघार घेऊन आता भारताशी चर्चेचा निर्णय घेणे खान यांच्यासाठी अवघड जात आहे. यातून इम्रान खान हे अपरिपक्व नेते असल्याचे उघड होत आहे, अशी खंत एकेकाळी इम्रान?खान यांचे समर्थन करणारे पत्रकार व विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत.

leave a reply