भारतीय औषधनिर्मिती क्षेत्राच्या निर्यातीत १८ टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली – कोरोनाची साथ आल्यानंतर, जगाची फार्मसी अशी जागतिक ओळख बनलेल्या भारताच्या औषधनिर्मिती क्षेत्राने मोठी झेप घेतली आहे. २०२०-२१ या वित्तीय वर्षात देशाच्या औषधनिर्मिती क्षेत्राने तब्बल २४.४४ अब्ज डॉलर्सची निर्यात केली आहे. या क्षेत्रात जागतिक पातळीवर सुमारे एक ते दोन टक्क्यांची घट नोंदविली जात असताना या क्षेत्रातील भारताच्या निर्यातीत १८ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

२०१९-२० या वर्षात भारताच्या औषधनिर्मिती उद्योगाची निर्यात सुमारे २०.५८ अब्ज डॉलर्स इतकी होती. आधीच्या वर्षाच्या तुलनेत यात ७.५७ टक्क्यांची वाढ झाली होती. मात्र २०२०-२१ या वित्तीय वर्षात यात तब्बल १८.०७ टक्के इतक्या घसघशीत वाढीची नोंद झाली आहे. देशाच्या औषधनिर्मिती कंपन्यांनी सुमारे २४.४४ अब्ज डॉलर्स इतकी निर्यात केली आहे. यामध्ये औषधांबरोबरच लसींची संख्या लक्षणीय असल्याचे सांगितले जाते. मुख्य म्हणजे जागतिक औषधनिर्मिती क्षेत्रात सुमारे एक ते दोन टक्क्यांची घट सहन करावी लागलेली असताना, भारताच्या या क्षेत्रातील निर्यातीत झालेली वाढ लक्षणीय ठरते.

पुढच्या काळात देशाचे औषधनिर्मिती क्षेत्र अधिक वेगाने विस्तारेल, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. विशेषतः कोरोना प्रतिबंधक लसींचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करून भारताने सार्‍या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याचवेळी या लसींचा शक्य तितक्या देशांना पुरवठा करण्याचे उदार धोरण भारताने स्वीकारले असून याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक होत आहे. कोरोनाच्या या लसी देशांतर्गत मागणी पूर्ण झाल्याखेरीज इतर देशांना पुरवू नका, अशी मागणी सुरू झाली आहे. मात्र या लसी विकसित करण्यासाठी भारताला इतर देशांचे सहकार्य मिळाले होते. हे सहकार्य लक्षात घेतले तर या लसी इतरांना पुरविण्याची जबाबदारी भारताला पार पाडावीच लागेल, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नुकतेच जाहीर केले होते.

दरम्यान, भारत जगाची फार्मसी बनला आहे, अशी प्रशंसा ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारतीय पंतप्रधानांबरोबर फोनवरील चर्चेत केली होती. पुढच्या काळात भारताच्या या ख्यातीमध्ये अधिकच भर पडणार असून औषधनिर्मिती क्षेत्रातील भारताची प्रगती केवळ भारतीयांनाच नाही तर सार्‍या जगाला आश्‍वस्त करणारी असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

leave a reply