भारतीय पंतप्रधानांच्या अमेरिका दौर्‍याने पाकिस्तानच्या चिंता वाढविल्या

नवी दिल्ली – पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौर्‍याला मिळालेल्या प्रतिसादामुळे पाकिस्तानच्या चिंता प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. विशेषतः अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया यांच्यासह भारताचा क्वाडमधील सहभाग ही आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा प्रभाव वाढविणारी बाब ठरते. अशीच परिस्थिती कायम राहिली, तर लवकरच भारत संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्यही बनेल, अशी भीती पाकिस्तानला वाटू लागली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौर्‍याला मिळालेल्या यशावर चर्चा करताना, पाकिस्तानच्या काही पत्रकारांनी ही भीती व्यक्त केली.

भारतीय पंतप्रधानांच्या अमेरिका दौर्‍याने पाकिस्तानच्या चिंता वाढविल्यासंयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत बोलताना भारताच्या पंतप्रधानांनी देशाच्या लोकशाहीवादी परंपरेचा गौरवपूर्ण उल्लेख केला. भारतात हजारो वर्षांपासून लोकशाहीची परंपरा चालत आलेली आहे, असे पंतप्रधान म्हणाले होते. भारताचा विकास, म्हणजे जगाचा विकास आणि भारताने घडविलेली सुधारणा म्हणजे जगातील सुधारणेला मिळालेली गती ठरते, असे सांगून पंतप्रधानांनी भारताचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित केले होते. त्याची दखल पाकिस्तानच्या माध्यमांनाही घ्यावी लागली. त्याचवेळी अमेरिकन उद्योगक्षेत्रातील मान्यवरांबरोबर झालेल्या भारतीय पंतप्रधानांच्या बैठकीला घवघवीत यश मिळाल्याचा दावा पाकिस्तानची माध्यमे करीत आहेत.

यामुळे भारतात येणार्‍या गुंतवणुकीचा ओघ प्रचंड प्रमाणात वाढेल आणि त्याच्या बरोबरीने भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वही अधिकाधिक प्रमाणात वाढत जाईल, असे सांगून यापासून पाकिस्तानला फार मोठा धोका संभवतो, असा इशारा पाकिस्तानातील भारतद्वेष्ट्या विश्‍लेषकांनी दिला. अफगाणिस्तानातील अपयशामुळे निराश झालेली अमेरिका आपल्या या अपयशाचे खापर फोडण्यासाठी बळीचा बकरा शोधत आहे. यासाठी पाकिस्तानचा वापर केला जाईल व म्हणूनच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील चर्चेदरम्यान अमेरिकेकडून पाकिस्तानवर होत असलेल्या टीकेची धार वाढत चालली आहे, असा निष्कर्ष पाकिस्तानातील काही जबाबदार पत्रकारांनी नोंदविला आहे.

भारत व अमेरिकेमधील सहकार्याच्या मागे असलेली ही पार्श्‍वभूमी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी लक्षात घेतली नाही. पंतप्रधान इम्रान खान सतत तालिबानची वकिली करून पाकिस्तानला अडचणीत टाकत आहेत. त्यामुळे नजिकच्या काळात अमेरिका भारताचा वापर करून पाकिस्तानला अद्दल घडविल, असे दावे या देशातील वरिष्ठ पत्रकार करीत आहेत. यासाठी भारत व अमेरिकेने पूर्वतयारीही केली आहे. न्यूझीलंडच्या व त्यानंतर इंग्लंडच्या क्रिकेट संघाने पाकिस्तानात खेळण्यास दिलेल्या नकारामागे हीच बाब असल्याचा इशारा या पाकिस्तानी पत्रकारांनी दिला आहे. तालिबानचे उघडपणे समर्थन करणारा दहशतवादी देश ही पाकिस्तानची प्रतिमा बनविली जात असून याचा फार मोठा फटका पाकिस्तानला बसणार आहे. भारत याचा पुरेपूर लाभ घेईल व लवकरच भारताकडून पाकिस्तानच्या विरोधात कठोर कारवाई अपेक्षित आहे, अशी धास्तावलेली प्रतिक्रिया पाकिस्तानची माध्यमे देत आहेत.

leave a reply