भारतीय पोलाद कंपन्यांनी जागतिक बाजारात हिस्सेदारी वाढवावी – केंद्रीयमंत्री नितीन गडकरी

नवी दिल्ली – भारतीय पोलाद कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी हिस्सेदारी मिळवून या क्षेत्रात जगाचे नेतृत्व करावे. पण यासाठी भारतीय कंपन्यांना गुणवत्ता व उत्पादन सुधारण्यावर भर द्यावा लागेल, असे आवाहन केंद्रीय रस्तेे व अवजड उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. ‘भारतीय पोलाद उद्योग- कच्चा माल’ या विषयावर आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये गडकरी बोलत होते.

पोलाद, नितीन गडकरी

कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर जागतिक अर्थव्यवस्थेसह भारतीय अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. भारतीय पोलाद कंपन्यानाही त्याचा फटका बसला आहे. यापार्श्वभूमीवर गडकरी यांनी पोलाद कंपन्याना जागतिक बाजारात आपले वर्चस्व वाढविण्याची हीच वेळ असल्याचे लक्षात आणून दिले. कोरोनाव्हायरसमुळे आलेल्या संकटाकडे संधी म्हणून बघा असे आवाहन गडकरी यांनी पोलाद उत्पादक कंपन्याना केले आहे.

भारत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. कोरोनाव्हायरसमुळे आलेले आर्थिक संकटावर मात करण्यासाठी भारतीय उद्योगांनी सकारात्मकता आणि आत्मविश्वास निर्माण करण्याची वेळ आली आहे, असे केंद्रीयमंत्र्यांनी सांगितले. भारतीय पोलाद कंपन्यांनी निर्यात वाढीवर भर द्यावा आणि आयात कमी करावी. यासाठी कंपन्यांना आपली क्षमता वाढवावी लागेल. कंपन्यानी आधुनिक तंत्रज्ञानचा वापर सुरू केला, तर परकीय गुंतवणूकदारांना आकर्षित होतील आणि देशात गुंतवणूक वाढेल असे केंद्रीयमंत्री गडकरी म्हणाले.

पुढील दोन वर्षात ‘नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडिया’ (एनएचएआय) रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या विकासात सुमारे १५ लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. रस्ते आणि रेल्वे पुलांचे मोठ्या प्रमाणावर बांधकाम होणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर देशातच पोलादाची आवश्यकता भासेल, असे गडकरी यांनी लक्षात आणून दिले.

leave a reply