अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असताना २०२१ सालात भारतातील सोन्याची मागणी वाढेल

- ‘वर्ल्ड गोल्ड काऊन्सिल’चा दावा

नवी दिल्ली – कोरोनाच्या साथीमुळे २०२० सालात सोन्याची खरेदी मंदावलेली होती. पण या वर्षापासून अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असताना, सोन्याच्या खरेदीत वाढ होईल, असा विश्‍वास ‘वर्ल्ड गोल्ड काऊन्सिल’चे भारतातील मॅनेजिंग डायरेक्टर ‘सोमसुंदरम पीआर’ यांनी व्यक्त केला आहे. सोन्याच्या दरात मोठी वाद झालेली असली तरी ग्राहक यावर्षी मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करतील व सोन्याच्या मागणीत वाढ होईल, असा दावा सोमसुंदरम यांनी केला आहे.

कोरोनाच्या साथीमुळे २०२० सालात सोन्याची मागणी कमालीची घटली होती. तरीही धनत्रयोदशीला सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली होती. हे प्रमाण आधीच्या वर्षीच्या तुलनेत कमी असले तरी २०२०च्या एप्रिल-जून महिन्यातील सोन्याच्या मागणीच्या तुलनेत खूपच वाढलेले होते, अशी नोंद करणारा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. ‘गोल्ड आऊटलूक २०२१- इकॉनॉमिक रिकव्हरी अँड लो इंटरेस्ट रेटस् सेट द टोन’ असे शीर्षक असलेल्या या अहवालात यावर्षात सोन्याच्या खरेदीचा कल वाढेल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला आहे.

‘सोन्याच्या दरात झालेली सुमारे २० टक्क्यांची वाढ आता ग्राहकांनी स्वीकारलेली आहे. त्याचवेळी शेअर बाजाराचा कल बाजारातील रोखता निश्‍चित करणार असून यामुळे याच्या गुंतवणुकीतील जोखीम वाढली आहे. कमी व्याजदर आणि कोरोनाचे संकट टळत आल्याने पूर्वपदावर येणारे जनजीवन व कौटुंबिक कार्यक्रम यामुळे २०२१ सालातील सोन्याची मागणी वाढतच जाईल’, असा दावा सोमसुंदरम यांनी केला आहे. सुवर्णाच्या अलंकारांची बाजारपेठ ग्राहकांसमोर अधिक कल्पक पर्याय ठेवून वाढलेल्या सोन्याच्या दरांचा सामना करील, असा विश्‍वास सोमसुंदर यांनी व्यक्त केला.

याबरोबरच सोन्यातली गुंतवणूक अनिश्‍चिततेच्या काळात अधिक चांगला व शाश्‍वत परतावा देणारी ठरत असल्याने, अर्थव्यवस्था पूर्वपदावर आल्यानंतर गुंंतवणूकदार याकडे नक्कीच वळतील, असे सोमसुंदर यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, कोरोनाच्या साथीचा सोन्याच्या उत्खननावरही परिणाम झाला होता. २०२० साली या आघाडीवरील अनिश्‍चिततेचा परिणाम सोन्याच्या मागणी व पुरवठ्यावर झाला होता. मात्र २०२१ सालात सोन्याच्या पुरवठ्याच्या आघाडीवरील ही अनिश्‍चितता कायम राहण्याची शक्यता नाही. कोरोनाव्हायरसच्या दुसर्‍या लाटेची शक्यता बळावल्यानंतरही सोन्याच्या पुरवठा साखळीवर त्याचा विशेष परिणाम होणार नाही, असे मत सोमसुंदरम यांनी व्यक्त केले आहे.

leave a reply