पाकिस्तानकडून सुरू असलेल्या ‘फेक न्यूज कॅम्पेन’वर भारताचे टीकास्त्र

नवी दिल्ली – पाकिस्तानकडून भारताची प्रतिमा डागाळण्यासाठी सोशल मीडियावर चुकीची माहिती व फेक न्यूजची जोरदार मोहीम सुरू आहे, अशी टीका भारताने संयुक्त राष्ट्रसंघात केली आहे. अमेरिकेतील ‘स्टॅनफोर्ड इंटरनेट ऑब्झर्व्हेटरी’ने (एसआयओ) प्रसिद्ध केलेल्या अहवालाचा दाखला घेऊन भारताने पाकिस्तानवर हे आरोप केले आहेत.

'फेक न्यूज कॅम्पेन’

‘भारताची प्रतिमा मलीन करण्यासाठी पाकिस्तानकडून खोटा प्रचार करण्यात येत आहे. यामध्ये दुर्भावनापूर्ण प्रचार, चुकीची माहिती, खोट्या बातम्या आहेत. एसआयओच्या अहवालात, या चुकीच्या माहितीचा प्रचार कसा केला जात आहे याची माहिती असून त्याकडे लक्ष द्यायला हवे. सत्य जगासमोर आले आहे’, अशा शब्दात भारताच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्‍थायी प्रतिनिधींनी करून पाकिस्‍तानच्या कारवायांकडे लक्ष वेधले आहे. काही दिवसांपूर्वी भारतविरोधी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल फेसबुक आणि इन्स्टाग्रामने पाकिस्तानमधील काही गट आणि व्यक्तीगत अकाऊंटवर कारवाई केली होती. यामध्ये फेसबुकने अपप्रचार पसरविणाऱ्या आरोपाखाली १०३ पोस्ट, ७८ ग्रुप, ४५३ फेसबुक अकाउंट आणि १०७ इन्स्टाग्राम खात्यांवर कारवाई केली होती.

'फेक न्यूज कॅम्पेन’

पाकिस्तानात काही जणांकडून खोट्या बातम्यांचे नेटवर्क चालविले जात असून पाकिस्तानमधील राजकीय नेत्यांचाही या व्यक्तींबरोबर संबंध आहे, असे एसआयओने अहवालात म्हटले होते. काही पेजवर आणि ग्रुप्सवर पाकिस्तानशी संबंधित माहिती टाकण्यात आली आहे. यातल्या काही पोस्टमध्ये भारतावर टीका करताना पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय आणि इम्रान खान यांची तसेच ‘तेहरिक-ए-इन्साफ’ पक्षाची प्रशंसा करण्यात आली आहे. २८ ऑगस्ट रोजी फेसबुकने ‘एसआयओ’सोबत या अहवालातली काही माहिती शेअर केली होती. या रिपोर्टमध्ये पाकिस्तानमधून सोशल मीडियावर भारताविरोधात चालविण्यात येणाऱ्या मोहिमेवर टीका करण्यात आली आहे. या रिपोर्टमध्ये, ७०,००० अकाऊंट्स व ११लाख युजर्स मोहिमेशी जोडले गेल्याचा दावाही करण्यात आला आहे.

काही ग्रुपमध्ये भारतीयांना लक्ष्य बनविण्यात आले आहे. त्यात भारताचे पंतप्रधान तसेच राजकीय पक्षांची बदनामी करणाऱ्या माहितीचाही समावेश आहे. या पोस्ट उर्दू, हिंदी, इंग्रजी आणि पंजाबी भाषेत आहेत. फेसबुकने अशा प्रकारे फेक न्यूज पसरविण्यात सहभागी असणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या ‘इंटरसर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स विंग’शी संबंधित अकाउंटसना एप्रिल २०१९ मध्ये निलंबित केले होते.

leave a reply