महाराष्ट्र, दिल्लीसह १३ राज्यात कोरोनाचे संक्रमण कमी होत असल्याचे संकेत

- आरोग्य मंत्रालयाच्या संयुक्त सचिवांची माहिती

नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे परिस्थिती चितांजनक बनली आहे. मात्र आता काही राज्यांतून कोरोनाचे संक्रमण वाढण्याचे थांबल्याचे, या राज्यांमध्ये कोरोनाचे दरदिवशी आढळणारे रुग्ण कमी होत असल्याचे किंवा ते स्थिरावल्याचे दिसून येत आहे. यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्लीसह १३ राज्यांचा समावेश आहे. यातून या राज्यांमध्ये कोरोनाची साखळी मोडत असल्याची काही सुरुवातीचे संकेत मिळत आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी म्हटले आहे. मात्र या प्राथमिक संकेताच्या आधारावर आताच स्थितीबाबत विश्‍लेषण करणे घाईचे ठरेल. त्यामुळे कोणत्याही परिस्थिती गाफील राहता येणार नाही, असेही अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

देशात सोमवारच्या सकाळपर्यंतच्या चोवीस तासात ३ हजार ४१७ जण दगावले. तसेच ३ लाख ६८ हजार नव्या रुग्णांची नोेद झाली होती. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत नव्या रुग्णांची संख्या घटली आहे. महाराष्ट्र, दिल्लीसह काही राज्यांमध्ये नव्या रुग्णांची संख्या कमी नोंदविण्यात आल्याने एकूण देशभरात दरदिवशी सापडत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट दिसत आहे. सोमवारी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीतही याकडे लक्ष वेधण्यात आले.

महाराष्ट्र, दिल्ली, छत्तीसगड, पंजाब, झारखंड, उत्तर प्रदेशात चोवीस तासात आढळणार्‍या रुग्णांची संख्या घटल्याचे किंवा स्थिरावल्याचे दिसत आहेत. गुजरात, दिव-दमण, मध्य प्रदेश, तेलंगणा, उत्तराखंडमध्येही अशीच स्थिती दिसत आहे. यातून या राज्यांमध्ये कोरोनाची साखळी मोडत असल्याचे प्राथमिक संकेत मिळत आहेत, अग्रवाल यांनी सांगितले. गेल्या पंधरा दिवसात महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमध्ये नव्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे.

या राज्यांमध्ये रुग्णसंख्या घटत असली, तरी काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढ कायम आहे. यामध्ये बिहार, राजस्थान, हरियाणा, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि पश्‍चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे, अशी माहितीही अग्रवाल यांनी दिली. तसेच देशातील १२ राज्ये अशी आहेत, ज्यामध्ये ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या लाखांहून अधिक आहे. तसेच सात राज्ये अशी आहेत की या राज्यांमध्ये ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ५० हजार ते लाखाच्यामध्ये आहे. तर १७ राज्यांमध्ये ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ५० हजारांहून कमी आहे. महाराष्ट्रात साडे सहा लाख ऍक्टिव्ह रुग्ण असून यानंतर केरळ, कर्नाटक, दिल्ली व उत्तर प्रदेशात ऍक्टिव्ह रुग्ण अधिक आहेत.

यावेळी एम्सचे संचलाक डॉ.रणदिप गुलेरिया यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सीटी स्कॅन करू नका, असे आवाहन कोरोना रुग्णांना केले आहे. सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांसाठी सीटी स्कॅनची आवश्यकता नाही. यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. एक सीटी स्कॅन ३०० ते ४०० एक्सरेप्रमाणे असतो. यातून मोठ्या प्रमाणावर रेडीएशन सोडली जातात. यामुळे भविष्यात कॅन्सर सारखा आजार होण्याचा धोका वाढतो, असे डॉ. गुलेरिया म्हणाले. दरम्यान, सोमवारी महाराष्ट्रात ४८ हजार ६२१ नव्या रुग्णांची नोंद झाली. तसेच ५६७ रुग्ण दगावले. तसेच ५९ हजार ५०० रुग्ण बरे झाले.

leave a reply