निर्वासितांचे लोंढे रोखण्यासाठी पोलंडकडून आणीबाणी जाहीर करण्याचे संकेत

वॉर्सा/मिन्स्क – बेलारुसमधून येणारे निर्वासितांचे लोंढे रोखण्यासाठी पोलंडने आणीबाणी लागू करण्याचे संकेत दिले आहेत. बेलारुसला लागून असलेल्या सीमाभागातील स्थिती अजूनही तणावपूर्ण असून संकटाची व्याप्ती वाढत चालली आहे, अशा शब्दात पोलंडचे पंतप्रधान मॅटेस्झ मोराविकी यांनी आणीबाणीचे संकेत दिले. अवैध निर्वासितांना रोखण्यासाठी पोलंडने यापूर्वीच सीमाभागात कुंपण उभारण्यास सुरुवात केली असून लष्करी तुकडीही तैनात केली आहे.

युरोपिय महासंघाने बेलारुसचे सर्वेसर्वा अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्यासह सरकारवर कडक निर्बंध लादले आहेत. लुकाशेन्को यांना विरोध करणाऱ्या नेत्यांना काही युरोपिय देशांनी आश्रयही दिला असून बेलारुसवर दडपण टाकण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. महासंघाच्या या कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी बेलारुसने निर्वासितांचा वापर सुरू केल्याचे समोर येत आहे. गेल्या महिन्यात दोन हजारांहून अधिक निर्वासितांनी घुसखोरी केल्याची माहिती पोलंडने दिली आहे.

बेलारुसकडून पोलंडमध्ये घुसविण्यात येणाऱ्या निर्वासितांमागे ऑलिंपिक खेळाडूच्या आश्रयाचाही मुद्दा असल्याचे मानले जाते. गेल्या महिन्यात टोकिओ ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी झालेल्या क्रिस्तसिना त्सिमानोस्काया या बेलारुसच्या महिला धावपटूने पोलंडच्या दूतावासात प्रवेश करून खळबळ उडवली होती. या घटनेनंतर पोलंड सरकारने क्रिस्तसिनाला मानवतावादी भूमिकेतून आश्रय देण्याचा निर्णय घेतला होता. या घटनेनंतर बेलारुस-पोलंड सीमेवरील निर्वासितांचे लोंढे वाढण्यास सुरुवात झाल्याचा आरोप पोलंडने केला आहे.

पोलंडमध्ये घुसविण्यात येणाऱ्या निर्वासितांमध्ये यापूर्वी आफ्रिकी व आखाती देशांमधील निर्वासितांचा समावेश होता. आता त्यात अफगाणिस्तानातील निर्वासितांचीही भर पडली असून हा मुद्दा अधिकच संवेदनशील बनला आहे. युरोपिय महासंघाने पोलंडकडून निर्वासितांविरोधात करण्यात येणाऱ्या कारवाईला संपूर्ण समर्थन दिले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका बैठकीत युरोपिय महासंघाने अफगाण निर्वासितांचे लोंढे रोखण्याबाबत निर्णय घेतल्याचेही समोर आले आहे.

या पार्श्‍वभूमीवर पोलंडने अधिक आक्रमक भूमिका घेत थेट आणीबाणी लादण्याचे संकेत दिले आहेत. बेलारुसच्या सीमेला लागून असलेल्या पॉडलास्की व लुबेल्स्की या प्रांतांमध्ये आणीबाणी लागू करण्यात येणार आहे. जवळपास एक महिन्याच्या कालावधीसाठी आणीबाणी लागू होणार असून त्यासाठी अतिरिक्त सुरक्षादलांचीही तैनाती करण्यात येईल. आणीबाणीच्या काळात निर्वासितांचा वावर पूर्णपणे रोखण्यात येईल, असा दावाही पोलिश सूत्रांनी केला आहे.

गेल्याच महिन्यात पोलंडने, निर्वासितांच्या माध्यमातून बेलारुस युरोपिय महासंघाविरोधात ‘हायब्रिड वॉर’ खेळत असल्याचा इशारा दिला होता. बेलारुस निर्वासितांचा वापर शस्त्रांसारखा करीत असल्याचा ठपका ठेवून पोलंडने खळबळ माजविली होती. तर े बेलारुस हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या हातात असलेले हत्यार असल्याचे ब्रिटनचा ख्यातनाम अभ्यासगट कॅथम हाऊसने म्हटले होते.

leave a reply