इंधनवाहू जहाजावरील हल्ल्यानंतर इस्रायल, इराणमधील अघोषित युद्ध भडकण्याचे संकेत

अघोषित युद्धजेरूसलेम – ओमानजवळ इस्रायली इंधनवाहू जहाजावर आत्मघाती ड्रोन्सच्या सहाय्याने चढविलेल्या हल्ल्यामध्ये दोन कर्मचार्‍यांचा बळी गेला. यामागे इराण असल्याचा आरोप इस्रायलने केला आहे. ‘इराण ही केवळ इस्रायलची समस्या नाही. दहशतवाद, विध्वंस आणि अस्थैर्याचा प्रायोजक इराण हा सार्‍या जगासाठी धोकादायक ठरतो’, असा इशारा इस्रायलचे परराष्ट्रमंत्री लॅपिड यांनी दिला. या घटनेनंतर इस्रायलचे संरक्षणमंत्री आणि संरक्षणदलप्रमुखांनी तातडीची बैठक घेतली. त्यामुळे या हल्ल्यामुळे इस्रायल इराणला उत्तर देण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.

दोन दिवसांपूर्वी युएईच्या दिशेने प्रवास करणार्‍या ‘मर्सर स्ट्रिट’ या इंधनवाहू जहाजावर हल्ला झाल्याची माहिती ब्रिटनच्या लष्कराने दिली होती. ओमानच्या ‘मसिरा’ बेटाजवळ झालेल्या या हल्ल्यामागे सागरी चाचे असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता. या इंधनवाहू जहाजाचे ऑपरेशन्स इस्रायली व्यावसायिकाच्या कंपनीकडे असल्याचे उघड झाल्यानंतर यामागे इराण असण्याची शक्यता वर्तविण्यात आली. शुक्रवारी उशीरा अमेरिकेच्या नौदलाने या जहाजावर ड्रोन्सचे हल्ले झाल्याची माहिती जाहीर केल्यानंतर यामागे इराण असल्याचा संशय बळावला आहे.

अघोषित युद्धअमेरिका किंवा ब्रिटनने जहाजावरील हल्ल्यासाठी इराणला थेट दोषी धरण्याचे टाळले. पण इस्रायलचे परराष्ट्रमंत्री लॅपिड यांनी अमेरिका, ब्रिटन तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या दूतावासांशी संपर्क साधून इराणच्या दहशतवादाविरोधात राष्ट्रसंघाच्या बैठकीत कठोर भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. दहशतवाद, विध्वंस आणि अस्थैर्याचा प्रायोजक असणार्‍या इराणपासून इस्रायलबरोबरच सार्‍या जगाला धोका असल्याचे लॅपिड म्हणाले. तसेच सागरी स्वातंत्र्याच्या सुरक्षेसाठी इराणच्या दहशतवादाविरोधात आंतरराष्ट्रीय समुदायाने निर्णय घ्यावा, असे आवाहन इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केले.

इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ आणि संरक्षणदलप्रमुख अवीव कोशावी यांच्यात तातडीची सुरक्षाविषयक बैठक झाल्याच्या बातम्या इस्रायली माध्यमे देत आहेत. परराष्ट्रमंत्री लॅपिड यांचा इशारा आणि संरक्षणमंत्र्यांची बैठक पाहता, इस्रायल इराणला उत्तर देण्याची तयारी करीत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. गेली दोन वर्षे हिंदी महासागर, ओमानचे आखात, रेड सी तसेच सिरियच्या सागरी क्षेत्रात एकमेकांच्या व्यापारी व इंधनवाहू जहाजांवर हल्ले चढवून इस्रायल आणि इराण यांच्यात अघोषित युद्ध सुरू होते. पण गुरुवारच्या घटनेत दोन कर्मचार्‍यांचा बळी गेल्यानंतर या अघोषित युद्धाचा भडका उडण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. असे झाले तर पर्शियन आखात ते रेड सीच्या क्षेत्रातील तणाव वाढू शकतो.

leave a reply