एलएसीवर भारत-चीन चर्चेचा प्रभाव पडल्याचे दिसत नाही

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

अमरावती – लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीनमध्ये आत्तापर्यंत चर्चेच्या नऊ फेर्‍या पार पडल्या आहेत. या चर्चेचा प्रभाव एलएसीवर पडल्याचे दिसत नाही, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले. भारताबरोबर वाटाघाटी करीत असला, तरी चीन लडाखच्या एलएसीवरील आपले जवान मागे घ्यायला तयार नाही, त्यामुळे तणाव निवळण्याची शक्यता नाही, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर वेगळ्या शब्दात सांगत आहेत. याआधी आजी-माजी लष्करी अधिकार्‍यांनी देखील लडाखच्या एलएसीवरील तणाव इतक्यात कमी होणार नाही, असा निष्कर्ष नोंदविला होता.

गेल्या नऊ महिन्यांहून अधिक काळ लडाखच्या एलएसीवरील वाद सुरू आहे. आत्तापर्यंत हा वाद सोडविण्यासाठी उभय देशांमध्ये चर्चेच्या नऊ फेर्‍या पार पडल्या. तरीही त्यातून फारसे काही हाती लागलेले नाही. नवव्या फेरीची चर्चा पार पडल्यानंतरही एलएसीवर त्याचा प्रभाव पडलेला दिसत नाही, असे सांगून परराष्ट्रमंत्र्यांनी चीन भारताबरोबर सहकार्याची नाही, तर अडवणुकीची भूमिका स्वीकारीत असल्याचे संकेत दिले. जोवर लडाखच्या एलएसीवर एप्रिल महिन्याच्या आधीची स्थिती निर्माण होणार नाही, तोवर आपण या क्षेत्रातून सैन्य मागे घेणार नाही, अशी भारताची भूमिका आहे. याबाबत तडजोड शक्य नसल्याचे भारताने वेळोवेळी चर्चेत स्पष्ट केले होते.

मात्र भारताने लडाखच्या एलएसीवरून एकतर्फी माघार घ्यावी, अशी मागणी चीनकडून केली जात आहे. यामुळे आत्तापर्यंत पार पडलेल्या चर्चेतून काहीही निष्पन्न होऊ शकलेले नाही. उलट चर्चेची प्रक्रिया सुरू असताना, चीन लडाखच्या एलएसीवर मोठ्या प्रमाणात रणगाडे तैनात करून व त्यांच्या हालचाली करून भारतावर दडपण वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समोर आले होते. पण भारताने चीनला त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याची संपूर्ण तयारी ठेवलेली आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी त्याचा पुनरुच्चार केला.

गेल्या वर्षी लडाखच्या एलएसीवर जे काही झाले, त्यानंतर भारताने या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सैन्यतैनाती केलेली आहे. चीनच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी भारताने हा निर्णय घेतल्याचे सांगून लष्करी बळावर चीन एलएसीवरील परिस्थिती बदलू शकणार नाही, असा संदेश परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी दिला आहे. याआधीही भारताच्या संरक्षणमंत्र्यांनी चीनच्या आगळिकीला मुखभंग करणारे प्रत्युत्तर दिले जाईल, असे बजावले होते. तर वायुसेनाप्रमुख आरकेएस भदौरिया यांनी भारताच्या विरोधात पाकिस्तानशी हातमिळवणी करण्याच्या तयारीत असलेल्या चीनला आपल्या सामर्थ्यावर विश्‍वास राहिलेला नसल्याचा टोला लगावला होता.

leave a reply