अफगाणिस्तानातील माघारीनंतर बायडेन यांच्या विरोधात अमेरिकेत संतप्त प्रतिक्रिया

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या संरक्षणदलांचे प्रमुख, वरिष्ठ लष्करी अधिकारी यांनी एकमताने अफगाणिस्तानातून सैन्यमाघारीचा निर्णय घेतला होता, असे सांगून राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी अफगाण माघारीची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेचे ‘कमांड इन चिफ’ असलेल्या बायडेन यांच्या या भूमिकेवर अमेरिकेत संताप व्यक्त केला जात आहे. अमेरिकेच्या इतिहासात कधीही युद्धातून माघार घेणे इतक्या बेजबाबदारपणे हाताळले गेले नसेल, असे ताशेरे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओढले. तर अमेरिकेच्या या लज्जास्पद माघारीचा रशिया व चीन लाभ घेतील, अशी चिंता अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी व्यक्त केली.

अमेरिकेची अफगाणिस्तानातील सैन्यमाघार सोमवारी मध्यरात्री पूर्ण झाली. याविरोधात अमेरिकेत संतापाची लाट उसळली आहे. याची जाणीव झालेल्या बायडेन प्रशासनाने अफगाण माघारीच्या निर्णयाचे समर्थन करणे सुरू केले आहे. गेल्या 20 वर्षांपासून अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या जवानांची तैनाती संपुष्टात आल्याचे बायडेन म्हणाले. तसेच येत्या काही तासात यावर आपण बोलणार असल्याचे सांगून बायडेन यांनी माध्यमांच्या प्रश्‍नांना सामोरे जाण्याचे टाळले. अमेरिकेचे संरक्षणमंत्री व परराष्ट्रमंत्री यांनीही अफगाण माघारीचे समर्थन केले.

पण बायडेन यांच्या कमजोर नेतृत्वामुळे अमेरिकेला इतिहासातील सर्वात मानहानीकारक माघार घ्यावी लागल्याची माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी टीका केली. त्याचबरोबर बायडेन यांनी अमेरिकेचा सर्व शस्त्रसाठा अफगाणिस्तानात सोडून दिल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. तो परत मिळविण्यासाठी बायडेन यांनी प्रयत्न करावे, अन्यथा थेट लष्करी कारवाई करून आपला शस्त्रसाठा परत मिळवावा, अशी मागणी माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली.

अमेरिकेचा हा शस्त्रसाठा तालिबान तसेच इतर दहशतवादी संघटनांच्या हाती पडल्याची टीका होत आहे. या बेजबाबदार माघारीसाठी अमेरिकेतून बायडेन यांच्यावर आरोप होऊ लागले आहेत. बायडेन यांनी माघारीच्या नावाखाली अमेरिकेच्या सर्वात मोठ्या शत्रूला सुसज्ज केल्याचा ठपका अमेरिकेत ठेवला जात आहे.

leave a reply