आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचा इराणच्या अणुकार्यक्रमावरून नवा इशारा

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जाव्हिएन्ना/जेरूसलेम – अमेरिका व युरोपिय देशांच्या आक्षेपांना काडीचीही किंमत न देता, इराणने आपल्या अणुप्रकल्पातील युरेनियम मेटलचे संवर्धन सुरू ठेवले आहे. इराणने 200 ग्रॅम युरेनियम मेटलचे 20 टक्क्यांपर्यंत संवर्धन करून 2015 सालच्या अणुकरारातील आणखी एका नियमाचे उल्लंघन केले. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने आपल्या अहवालाद्वारे ही माहिती उघड केली. यामुळे इराण अणुबॉम्बच्या निर्मितीजवळ पोहोचत असल्याचा आरोप इस्रायली माध्यमे करीत आहेत.

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने सुरक्षा परिषदेच्या सदस्यांसाठी एक अहवाल तयार केला. या अहवालात शनिवार, 14 ऑगस्ट 2021च्या काही ठळक नोंदी केल्या आहेत. या दिवशी इराणच्या अणुप्रकल्पात युरेनियम मेटलचे संवर्धन झाल्याचे अणुऊर्जा आयोगाच्या निरिक्षकांनी म्हटले आहे. इराणने 200 ग्रॅम युरेनियम मेटलचे 20 टक्क्यांपर्यंत संवर्धन केल्याची माहिती निरिक्षकांनी दिली.

काही महिन्यांपूर्वी इराणने आपल्या अणुकार्यक्रमात चार महत्त्वाची उद्दिष्टे गाठण्याचे जाहीर केले होते. यामध्ये युरेनियमचे संवर्धन नियोजित मर्यादेपलिकडे नेणे, सेंट्रिफ्यूजेसची संख्या वाढविणे यांचा समावेश होता व ही दोन उद्दिष्टे इराणने गाठली आहेत. गेल्या आठवड्यात युरेनियम मेटलचे संवर्धन करून इराणने चारपैकी तिसरे उद्दिष्टही गाठल्याची चिंता आयोगाच्या निरिक्षकांनी आपल्या अहवालात व्यक्त केली.

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा‘रिॲक्टर फ्युएल प्लेट’ची निर्मिती करणे इराणचे चौथे उद्दिष्ट आहे. नागरी तसेच वैद्यकीय वापरासाठी आपण अणुकार्यक्रमावर काम करीत असल्याचे इराणचे म्हणणे आहे. तसेच अणुप्रकल्पातील सर्व हालचाली या अण्वस्त्र प्रसारबंदी विधेयकाच्या नियमांच्या चौकटीत राहून करीत असल्याचा दावा इराण करीत आहे. पण गेल्या काही महिन्यांमध्ये सेंट्रिफ्यूजेसची अतिरिक्त संख्या आणि आत्ता युरेनियम मेटलचे संवर्धन वाढवून इराणने 2015 सालच्या अणुकराराचे उल्लंघन केल्याचा आरोप इस्रायल करीत आहे.

सहा वर्षांपूर्वीच्या करारानुसार, पुढील 15 वर्षांसाठी इराणवर युरेनियम किंवा प्लुटोनियम मेटलचे संवर्धन करण्यावर बंदी टाकली होती. पण युरेनियम मेटलचे 20 टक्क्यांपर्यंत संवर्धन करणारा इराण अणुबॉम्ब निर्मितीच्या जवळ पोहोचत असल्याचा इशारा इस्रायली विश्‍लेषक व माध्यमे देत आहेत. इराण पुढील दहा आठवड्यांमध्ये अणुबॉम्ब निर्मितीजवळ पोहोचेल, असे इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी काही दिवसांपूर्वी बजावले होते. अणुबॉम्ब निर्मितीसाठी प्रयत्न करणारा आणि आखातातील दहशतवादासाठी कारणीभूत असलेल्या इराणवर कारवाई करण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे गांत्झ म्हणाले होते.

इराणने युरेनियम मेटलच्या संवर्धनाबाबत अणुऊर्जा आयोगाने दिलेल्या इशाऱ्यावर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने चिंता व्यक्त केली. तरीही अमेरिकेचे बायडेन प्रशासन अणुकराराबाबत इराणशी वाटाघाटी करण्यावर ठाम असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी म्हटले आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानात एका रात्रीत तालिबानची राजवट प्रस्थापित झाल्यामुळे अमेरिकेच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. अशा परिस्थितीत इस्रायलच्या बेनेट सरकारने इराणच्या अणुकार्यक्रमावर अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाशी वाटाघाटी करताना अधिक सावधानता दाखवावी, अशी अपेक्षा इस्रायली माध्यमे व्यक्त करीत आहेत.

leave a reply