इराणचा बुशेहर अणुप्रकल्प तांत्रिक दोषामुळे शटडाऊन – इराणच्या अणुऊर्जा संस्थेची घोषणा

तेहरान – बुशेहर येथील इराणचा एकमेव अणुऊर्जा निर्मिती प्रकल्प अचानक शटडाऊन करण्यात आला. तांत्रिक दोषामुळे पुढील तीन ते चार दिवस अणुप्रकल्प बंद राहणार असल्याची माहिती इराणच्या अणुऊर्जा संस्थेने प्रसिद्ध केली. इराणच्या यंत्रणांनी या प्रकरणासाठी कुणालाही जबाबदार धरण्याचे टाळले. पण इराणला अणुबॉम्बनिर्मितीपासून रोखायचे असेल तर इराणच्या अणुप्रकल्पांवर नव्याने हल्ले चढविण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन इस्रायलच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दोन दिवसांपूर्वी केले होते.

दक्षिण इराणमधील बुशेहर अणुऊर्जा निर्मिती प्रकल्प तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आला आहे. रविवारी उशीरा ही माहिती उघड करण्यात आली. ‘प्रकल्पात तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे ऊर्जामंत्रालयाला माहिती देऊन सदर प्रकल्प बंद करण्यात आला आणि ऊर्जासंयंत्र देखील बंद करण्यात आली आहेत’, अशी माहिती इराणच्या अणुऊर्जा संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. तीन ते चार दिवसात प्रकल्प पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात येईल, असेही इराणने स्पष्ट केले.

यानंतर इराणच्या नॅशनल इलेक्ट्रिसिटी कंपनीने रविवारी इराणी जनतेला वीजेचा कमीतकमी वापर करण्याचे आवाहन केले. प्रकल्पातील दुरूस्तीचे काम आठवड्याच्या अखेरीपर्यंत चालू राहील, अशी शक्यताही कंपनीने व्यक्त केली. पण या तांत्रिक दोषाचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. इराणने २०१३ साली रशियाच्या सहाय्याने उभारलेला बुशेहर अणुप्रकल्प एक हजार मेगावॅट वीजेची निर्मिती करतो. याशिवाय इराण आणि रशियन कंपनी बुशेहरमध्येच हजार मेगावॅट क्षमतेचे आणखी दोन प्रकल्प उभारीत आहे.

अमेरिकेने २०१८ साली लादलेल्या निर्बंधांमुळे इराण बुशेहर अणुप्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय बाजारातून आवश्यक साहित्याची खरेदी करू शकलेला नाही. त्याचा थेट परिणाम बुशेहर अणुप्रकल्पावर होईल आणि हा प्रकल्प बंद पडेल, असा इशारा इराणच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित अधिकारी महमूद जाफरी यांनी मार्च महिन्यात दिला होता. त्यामुळे बुशेहर अणुप्रकल्पाच्या शटडाऊनमागे हे एक कारण असल्याचा दावा केला जातो.

पण गेल्या काही महिन्यांमध्ये इराणच्या अणुप्रकल्प तसेच संबंधित कंपन्यांमध्ये झालेले घटनाक्रम पाहता, बुशेहर अणुप्रकल्पातील घटनेकडे संशयाने पाहता येऊ शकते. गेल्या वर्षभरात इराणच्या नातांझ या अतिमहत्त्वाच्या अणुप्रकल्पात दोन वेळा स्फोट झाले. या दोन्ही स्फोटांसाठी इराणच्या सुरक्षा यंत्रणांनी अमेरिका आणि इस्रायलवर संशय व्यक्त केला होता. तर गेल्या महिन्यात बुशेहर शहरात इराण सरकारसंलग्न पेट्रोकेमिकल कंपनीत संशयास्पद स्फोट होऊन एकाचा बळी गेला होता.

दरम्यान, इराणमधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत इब्राहिम राईसी यांचा विजय झाल्याची घोषणा झाल्यानंतर बुशेहर प्रकल्पात ही घटना घडली आहे. इराणचा हा निवडणूक निकाल म्हणजे अणुकरारासाठी प्रयत्न करणार्‍या महासत्तांसाठी ‘फायनल वेक-अप कॉल’ असल्याचा इशारा इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी दिला. तर इराणला अणुबॉम्बच्या निर्मितीपासून रोखायचे असेल तर इस्रायलने इराणच्या अणुप्रकल्पांवर नव्याने हल्ले चढविण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन इस्रायलच्या वरिष्ठ अधिकार्‍याने एका मुलाखतीत म्हटले होते.

leave a reply